महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. 'लोकसेवा-समाजसेवा' या श्रेणीत ज्या पाच जणांना नामांकन मिळालं आहे, त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे. तुमची मतं आणि मान्यवर ज्युरींनी दिलेले गुण याद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड होईल.
डॉ. अशोक बेलखोडे, किनवट, जि. नांदेड
३,१८,७५१ रुग्णांची ओपीडी आणि ९२ हजार वेगवेगळ्या शस्त्रक्रिया. किनवटसारख्या आदिवासी भागात स्वत:च्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचा उपयोग करुन स्वत:ला वाहून घेतलेल्या डॉ. अशोक बेलखोडे यांची ही गेल्या २९ वर्षातली कमाई आहे. एमबीबीएस झाल्यानंतर अनेक जण स्वत:चे मोठे हॉस्पिटल तरी उभारतात किंवा मोठे पॅकेज मिळेल अशा हॉस्पिटलला जवळ करतात. मात्र डॉ. बेलखोडे बाबा आमटेंच्या कार्यातून प्रेरित झाले होते. नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा जन्मगावाचे त्यांच्यावर संस्कार होते. ग्रामीण भागातील दु:खांची त्यांना जाणीव होती. त्यातूनच त्यांना थेट आदिवासींच्या आरोग्यसेवेसाठी किनवट तालुक्यात आणले. १९९३ साली ते जिल्हा परिषदेच्या नागरी रुग्णालयात आले आणि या भागातील आरोग्य सेवेची गरज लक्षात घेऊन याच ठिकाणी अवघ्या दोन वर्षांत म्हणजे १९९५ साली त्यांनी स्वत:चा दवाखाना सुरू केला. चोवीस तास आपत्कालीन सेवा, नवजात शिशू दक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब, दुर्बिणीद्वारे कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, स्वतंत्र आंतररुग्ण विभाग, अशा सोयींचे एकमेव रुग्णालय त्यांनी उभे केले आहे. खेडोपाडी फिरता दवाखानाही त्यांनी सुरू केला. कोरोनाकाळात त्यांनी १ हजार कुटुंबांना धान्यांचे वाटपही केले. आता डॉ. अशोक बेलखोडे ‘भारत जोडो’ युवा अकादमीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एमआयडीसी भागात साने गुरुजी इमर्जन्सी ॲण्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारत आहेत.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
किशोर देशपांडे, सावली संस्था, कोल्हापूर
गेल्या दोन वर्षांत कोल्हापूरच्या रस्त्यांवरील आजारी आणि विकलांग अशा ८८ भिकाऱ्यांवर उपचार करणारे, जन्मत:च अपंग आणि अशा ३२ अनाथ मुलांना कायमस्वरूपी दत्तक घेत त्यांच्या शुश्रूषेबरोबरच औषधोपचार, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, स्पेशल एज्युकेशनची ही सोय करून देणारे किशोर रवींद्र देशपांडे आणि त्यांची सावली संस्था समस्त कोल्हापूरकरांच्या कौतुकाचा विषय आहे. सामाजिक भान असलेला किशोर रवींद्र देशपांडे हा युवक मुंबई, वसई, पुणे असा प्रवास करीत १८ वर्षांपूर्वी कोल्हापुरात आला आणि वृद्ध, दिव्यांग आणि आजारपणात परावलंबी असलेल्यांची काळजी घेतानाच्या व्यक्तिगत पातळीवरील मर्यादांची त्याला जाणीव झाली. त्यातूनच सर्वांची देखभाल करणाऱ्या सावली प्रकल्पाचा प्रारंभ झाला. नोकरदार, व्यावसायिक आणि सामान्यांनाही अनेक अडचणींमुळे वृद्धांची आजारपणातील देखभाल करणे जिकिरीचे झाले त्यांच्यासाठी सावली संस्था वरदान ठरली आहे. त्यांचे काम पाहून हजारो मदतीचे हात पुढे आले आणि राधानगरी रस्त्यावर अशा रुग्णांसाठी सुसज्ज इमारत उभारली गेली. या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही कारणाने परावलंबित्व आलेल्या १४५० हून अधिक रुग्णांची शुश्रूषा करण्याचे काम किशोर देशपांडे यांनी केले आहे. सामाजिक प्रश्नांवर केवळ मतप्रदर्शन करून न थांबता सुदृढ गाव योजनेतून गावपातळीवर रोज एक रुपयामध्ये आरोग्य सेवा हा प्रकल्प ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुरू करण्यात कल्पना त्यांनी अमलात आणली. आजही घरात शुश्रूषा करणे शक्य नसल्यास आपोआपच सावलीला फोन लावला जातो हे त्यांच्या कामाचे यश आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
डॉ. नंदकुमार व आरती पालवे, पळसखेड सपकाळ, जि. बुलढाणा
११०० बेवारस लोकांवर उपचार, ६ एचआयव्हीग्रस्त रुग्ण, ८ नॉर्मल वयोवृद्ध आणि काही दिव्यांग मनोरुग्ण असा परिवार आहे. डॉ. नंदकुमार पालवे व डॉ. आरती पालवे दाम्पत्यांचा दहा वर्षांपासून ते हे शिवधनुष्य पेलत आले आहेत. जगाची, स्वत:च्या पोटापाण्याची, शरीरावरील जखमांची पर्वा नसणारे मनोरुग्ण, शरीराने जर्जर होऊन रस्त्यावर बेवारस असलेल्या गोरगरीब व्यक्ती उपेक्षेच्या धनी होतात. समाज, कुटुंब, व्यवस्था त्यांना नाकारते, त्यावेळी नंदकिशोर व आरती पालवे दाम्पत्य नाकारलेल्यांसाठी ‘सेवा संकल्प प्रतिष्ठान’च्या माध्यमातून हक्काचं घर घेऊन येतात. ७ ऑक्टोबर २०१२ रोजी बुलडाण्यात या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला चिखली, बुलडाणा व परिसरातील शहरी व ग्रामीण भागातील मनोरुग्णांचा शोध घेऊन त्यांना एकवेळचे अखंडित जेवण पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. रस्त्याच्या कडेला पडलेल्यांना रात्रीचं जेवण, कपडे व शरीराच्या स्वच्छतेसोबत नेमक्या उपचाराचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून या निराधारांना हक्काचे छत असावे ही भावना पुढे आली. पालवेंचे वडील ज्ञानेश्वर पालवे यांनी बुलडाणा-उंद्री रोडवरील पळसखेड सपकाळ येथील १ एकर जमीन सेवासंकल्पला दान दिली. त्यावर टीनशेड उभारून मनोरुग्णांचा सांभाळ सुरू झाला आहे. दहा वर्षांपूर्वी या पालवे दाम्पत्यांचे मैत्रीतून प्रेम फुलले. बसस्थानकावरील निराधार, बेवारस मनोरूग्णपण त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार. प्रेमाच्या आणाभाका घेत सुखी संसाराचे स्वप्नरंजन करण्याऐवजी त्यांनी आपले सहजीवन त्यांच्या प्रेमाच्या साक्षीदारांसाठीच अर्पित करण्याचा ध्यास घेतला, तो आजही सुरूच आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
शांताबाई धांडे, आंबेवंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर
आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणाऱ्या इंद्रायणी, फुले, समृद्धी, जिरवेल, आंबेमोहोर, काळ भात अशा सुवासिक वाणांची लागवड करणाऱ्या आणि हजारो शेतकऱ्यांना भात लागवडीचे प्रयोग पाहण्यासाठी बोलावणाऱ्या शांताबाई धांडे या आंबेवंगण (ता. अकोले, जि. अहमदनगर)च्या रोल मॉडेल आहेत. आंबेवंगण हे आदिवासी दुर्गम गाव. या गावात दिवसातून एक बस येते. अशा ठिकाणी शांताबाईंनी शाश्वत शेतीचे मॉडेल उभे केले आहे. भाताचे पीक आदिवासींचे जगण्याचे मुख्य साधन. पूर्वी पारंपरिक पद्धतीने भात पिकाची लागवड केली जायची. त्यात बियाणे, मजूर आणि रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. या पद्धतीने एकरी केवळ १० ते १२ क्विंटल उत्पादन निघत होते. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमीिन खराब होत होती. अशिक्षित शांताबाईंनी बायफ संस्थेकडून भात लागवडीच्या पद्धती समजावून घेतल्या. त्यांचे गाव डोंगर उतारावर आहे. या जमिनीत पाणी थांबून राहत नाही. अशा जमिनीत भात पिकांचे उत्पादन वाढविणे जिकिरीचे होते. शांताबाईंनी सुधारित भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करीत उत्पादनात दुपटीने वाढ करून भातशेती फायद्यात आणली. पाणी न थांबणाऱ्या भातखाचरांतही उत्पादन वाढविण्यासाठी हा प्रयोग यशस्वी झाला. या भागात त्यांनी सर्वप्रथम हा प्रयोग केला. उत्पादन दुपटीने वाढत आहे हे लक्षात येताच शांताबाईंनी बचत गटाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान गावोगावी पोहोचविले. शेतीत जिवाणू खतांचा वापर, पिकांची फेरपालट, मिश्र पीक पद्धतीचा अवलंब, हवामान बदलावर आधारित शेती असे अनेक यशस्वी प्रयोग त्यांनी राबविले आहेत.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
सृष्टी व सिद्धार्थ सोनवणे, शिरुरकासार, जि. बीड
कोरोनाकाळात रक्ताची नाती निष्ठुर झालेली आपण पाहिली, पण वन्यप्राण्यांना कुटुंबाप्रमाणे जीव लावणारे, १६ हजार वन्यप्राण्यांना जीवदान देणारे, एक लाख दुर्मीळ रोपांचे वाटप करून निसर्गासाठी हातभार लावणारे जोडपे आहे. ज्यांचे नाव सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे. तागडगाव (ता. शिरुर कासार, जि. बीड) येथे स्वत:च्या शेतात वन्यजीव पुनर्वसन केंद्र स्थापन करून त्यांनी नवी सृष्टी निर्माण केली आहे. १७ एकरांवर त्यांनी २ ऑक्टोबर २००१ रोजी वन्यजीव पुनर्वसन केंद्र सुरू केले. तरस, कोल्हे, खोकड, काळवीट, ससे अशांचा तेथे मुक्त संचार. वन्यजिवांची शिकार करणाऱ्या १५ जणांवर गुन्हे नोंदवणे, मूठभर धान्य पक्ष्यांसाठी, एक रुपया वन्यजिवांसाठी ही चळवळ उभारून प्रकल्पातील वन्यप्राण्यांच्या अन्नपाण्याची सोय केली. पशु-पक्ष्यांच्या सहवासातच सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे यांनी आपला संसार थाटला. वन्यजिवांचे पिंजरे त्यांचे घर. पिंजऱ्यातच ते, त्यांची मुलगी व आई राहतात. प्राणी-पक्षीच त्यांच्या कुटुंबातील लेकरं. प्राणी ठीक झाला की, ते त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. प्रकल्पाचा संपूर्ण खर्च लोकसहभागातून भागवला जातो. सिद्धार्थ आणि सृष्टी यांची बालपणापासून मैत्री होती. दोघांनीही वन्यप्राण्यांची आवड असल्याने त्यांनी आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. १२ सप्टेंबर २०१० साली सौताडा धबधब्याच्या शेजारी जंगलात या दोघांनी राष्ट्रीय पक्षिदिनी निसर्गविवाह केला. फुलांच्या हाराऐवजी दोघांनी अजगर व धामण एकमेकांच्या गळ्यात घालून लग्न केले. लग्नाला आलेल्यांनी झाडा-झुडपांच्या, वेलींच्या बिया अक्षता म्हणून त्यांच्यावर टाकल्या.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा.