महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. 'प्रॉमिसिंग राजकारणी' या श्रेणीत पाच तरुण-तडफदार नेत्यांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे. तुमची मतं आणि मान्यवर ज्युरींनी दिलेले गुण याद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड होईल.
आ. आदिती तटकरे - चक्रीवादळ व पुरामुळे तिचा कस लागला तेव्हा...
राजकारणाबरोबरच समाजकारणात काम करणाऱ्या अदिती तटकरे यांचा खरा कस लागला तो कोकणावर आलेल्या दोन मोठ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये. निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांवर जाऊन त्यांनी लोकांपर्यंत मदतकार्य पोहोचवण्याचे, त्यांना पुन्हा उभे करण्याचे काम त्यांनी केले. महिला असूनही अनेक किलोमीटर पायी चिखल तुडवत जाऊन या नैसर्गिक आपत्तीत त्या मदतकार्यात सगळ्यांच्या पुढे होत्या. चक्रीवादळ आणि पुराचा धोका असलेल्या या भागात कायमस्वरुपी एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्यासाठी पाठपुरावा केला. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वडील सुनील तटकरे यांच्या निवडणुकीत प्रचार करण्याच्या निमित्ताने २००८ पासून अदिती तटकरे यांचा राजकारणात प्रवेश झाला. घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या अदिती यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष ते राज्यमंत्री असा आतापर्यंत राजकीय प्रवास केला आहे.
'प्रॉमिसिंग राजकारणी' म्हणून मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
कुणाल राऊत - काँग्रेस पक्षासाठी लढणारा तरुण नेता
एखाद्या नेत्याच्या मुलाला वडिलांचा आधार घेत राजकारणात येणे जेवढे सोपे असते तेवढेच टिकून राहणे कठीणही असते. तो मुलगा सक्षम नसेल तर कार्यकर्ते व जनताही त्याला स्वीकारत नाही. हा इतिहास लक्षात घेऊन माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल यांनी युवकांमध्ये सक्रिय राहत, त्यांचे प्रश्न हाताळत राज्याच्या राजकारणात युवा नेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला आणि मार्च २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते सर्वाधिक साडेपाच लाख मते घेत युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर महागाई, बेरोजगारी, नोकरभरती, अग्निवीर योजना आदी मुद्यांवर त्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनातून त्यांनी विरोधकांसह स्वत:च्या पक्षालाही स्वत:ची ताकद दाखवून दिली.
'प्रॉमिसिंग राजकारणी' म्हणून मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
खा. मनोज कोटक - गोरगरिबांसाठी धावून जाणारा नेता
कोरोना काळात गरीब जनतेसाठी कम्युनिटी किचन सुरू करणारे, दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजारो फूड पॅकेटस्चे वितरण करणारे, जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्ससाठी मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझरचे वाटप करणारे नेते म्हणून ओळख असणारे नाव म्हणून खा. मनोज कोटक यांची ओळख आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात भाजपकडून खासदार असलेले कोटक मागील अनेक वर्षे या भागात कार्यरत आहेत. नगरसेवक ते खासदार अशा त्यांच्या प्रवासात सामान्यांच्या समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. कोविड काळात ज्यांना औषधांची गरज होती त्यांच्यापर्यंत औषधे, अन्न धान्याचे किटही त्यांनी गरीब लोकांपर्यंत पोहोचवले. प्रत्येक शनिवारी मतदारसंघात ४ ते ५ तास ते जनता दरबार भरवतात. तर २०१९ साली मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून खासदार झाले. सध्या ते संसदेच्या वाणिज्य, अर्थ आणि शिपिंग समितीवर सदस्य म्हणून काम करत आहेत.
'प्रॉमिसिंग राजकारणी' म्हणून मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
खा. नवनीत रवी राणा - महिलांच्या फायरब्रॅण्ड पब्लिक खासदार
हनुमान चालिसा पठण यावरून थेट उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला आव्हान देण्यामुळे नवनीत राणा चर्चेत आल्या. त्यात त्यांना १४ दिवस तुरुंगातही जावे लागले. महिलांसह शोषित, पीडितांचा बुलंद आवाज म्हणून त्यांची प्रतिमा समोर आली. लोकसभेत महाराष्ट्रातून एकमात्र अपक्ष खासदार म्हणून नवनीत रवी राणा यांची नोंद आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आल्या आहेत. फायरबॅण्ड अशी त्यांची ओळख आहे. कोरोना काळात रुग्णांना औषधी, मदत करून रुग्णवाहिका उपलब्ध केल्यात. दरवर्षी होळीला मेळघाटच्या आदिवासी पाड्यावर त्यांचा तीन दिवस मुक्काम असतो. सध्या त्या आरबीआय वित्तीय संसदीय समितीत सदस्य आहेत. लोकसभेतील त्यांची उपस्थिती ९८ टक्के राहिलेली आहे.
'प्रॉमिसिंग राजकारणी' म्हणून मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
आ. डॉ. राहुल पाटील- पदरमोड करून समाजसेवा करणारा राजकारणी
राजकारणी म्हटले की, ते केवळ रस्ते, वीज, पाण्यासह विकासात्मक कामांच्या मागे धावणारे अशी सर्वसामान्यांची भावना; परंतु शाश्वत विकासाची दृष्टी असणारे राजकारणी हे बोटावर मोजण्याइतकेच असतात. त्यातील एक नाव आहे आ. डॉ. राहुल पाटील. सामान्यांचे जगणे कसे सुकर होईल? मतदारसंघातील निराधार, विधवांसह सर्वसामान्य कुटुंबास हक्काचा रोजगार कसा मिळेल, यासाठी पदरमोड करणारे राजकारणी समाजसेवक म्हणून त्यांची परभणीत ओळख आहे. बहुतांश नेत्यांना नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविण्यातून वेळ मिळत नाही. अनेक जण स्वत:ला यातच गुरफटून घेतात. पण राहुल पाटलांनी हजारो नागरिकांचे खासगी प्रश्न वैयक्तिक पातळीवर पदरमोड करून सोडवल्याने अनेक कुटुंबं सक्षमपणे उभे राहिलेत. पक्षीय बंधने बाजूला सारून सर्व जातीधर्माच्या नागरिकांना रोजगार दिला.
'प्रॉमिसिंग राजकारणी' म्हणून मत देण्यासाठी इथे क्लिक करा.