महाराष्ट्राच्या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले अशा महाराष्ट्रीयांची दखल घेत 'लोकमत'ने सुरू केलेला सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा, समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. यंदाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनयातील 'नटसम्राट' नाना पाटेकर हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांचे मनोरंजन क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही विशेष योगदान राहिले आहे. समाजातील विविध घटनांची दखल ते घेत असतात तसेच 'नाम' संस्थेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ते काम करत आहेत. रोखठोक भूमिकेसाठी नाना ओळखले जातात. न पटणाऱ्या राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी उघडपणे टिप्पणी केली आहे. स्वाभाविकच, त्यांचे प्रश्न परखड असणार. त्याला महाराष्ट्राचं सरकार - अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसे सामारे जाणार हे पाहणं रंजक असेल.
देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राचं नेतृत्व हाती आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणाचं केंद्रस्थान बनले आहेत. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदेंची रोखठोक भाषणं चर्चेचा विषय ठरत आहेत. तर प्रत्येक विषयावर मुद्देसूद मांडणी करण्यात देवेंद्र फडणवीस माहीर आहेत. त्यामुळे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्गज राजकीय नेते शिंदे-फडणवीस यांची जुगलबंदी चांगलीच रंगेल, यात शंका नाही.
११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता वरळीच्या 'एनएससीआय डोम'मध्ये ही जाहीर मुलाखत होणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी 'लोकमत'च्या वाचकांनाही घेता येणार आहे. ''बूक माय शो'' या मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही या कार्यक्रमाची प्रवेशिका बुक करू शकता.
मोफत प्रवेशिका मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा नेहमीच खास ठरला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची मुलाखत असो किंवा मग अभिनेता रितेश देशमुखने फडणवीसांची घेतलेली मुलाखत असो 'लोकमत'च्या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर रोखठोक भूमिका मान्यवर मांडत आले आहेत. उद्धव ठाकरे आणि फडणवीस या सोहळ्यात एकत्र आले होते. तसंच, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे या बंधू-भगिनींची गळाभेट देखील याच सोहळ्यात झाली होती. बॉलीवूडमधील तारे-तारकांचीही या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती असते. यंदाही असे नेते आणि अभिनेते या सोहळ्यात रंग भरणार आहेत.