मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. वरिष्ठ राजकारणी या विभागात पाटील यांना गौरवण्यात आलं. महसूल मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान लोकमतकडून करण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी त्यांची कामगिरी अगदी उत्तमपणे सांभाळली. फार वादात न पडता आपलं काम चोखपणे बजावणाऱ्या मंत्र्यांमध्ये पाटील यांचा समावेश होता. भाजपाचे निष्ठानंत नेते अशीदेखील त्यांची ओळख आहे. मात्र यापेक्षा महसूल मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळेच लोकमतनं वरिष्ठ राजकारणी गटात त्यांची पुरस्कारासाठी निवड केली.
मुंबईतील कापड गिरण्यांतील चाय किटलीवाल्याचा मुलगा ते राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री असा चंद्रकांत पाटील यांचा प्रवास थक्क करणार आहे. कोणत्याही सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटावी अशीच चंद्रकांत पाटील यांची कारकिर्द आहे. ‘गुजरातचा चायवाला’ देशाचा पंतप्रधान झाला. आता मुंबईतील चायवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन नंबरचा मंत्री आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळ त्यांचे खानापूर म्हणून सुमारे तीन हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव. परंतु गावात पोट भरत नाही म्हणून पाटील यांचे वडील बच्चू पाटील हे मुंबईत गेले. मफतलाल नंबर २ या मिलमध्ये ते नोकरीस होते. मिलच्या कँटीनमध्ये किटलीबॉय अशी त्यांची नोकरी होती. त्यामुळे आमदार पाटील यांचा जन्म, बालपण व शिक्षणही मुंबईतच झाले. मितभाषी, कार्यकर्त्याला सन्मान देणारे व विकासाचा स्वत:चा असा एक दृष्टिकोन असलेला नेता अशी पाटील यांची ओळख आहे.
हे होतं परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.