ग्रामीण, दुष्काळी भागातील महिलांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणणाऱ्या चेतना सिन्हा यांना यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माणदेशी बिजनेस स्कुल सारख्या उल्लेखनीय उपक्रमातून ग्रामीण महिलांना व्यासपीठ आणि आत्मविश्वास देणाऱ्या सिन्हा यांचा समाजसेवा विभागातून गौरव करण्यात आला.मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
म्हसवडसारख्या ग्रामीण भागाचे नाव आंतराष्ट्रीय नकाशावर कोरणाऱ्या सिन्हा मूळ मुंबईच्या. लढाऊ वृत्तीचे बाळकडू असणाऱ्या सिन्हा यांनी आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्यासह शेकडो युवक-युवतींसह रस्त्यावर उतरल्या होत्या. मुंबई सोडून म्हसवडचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते विजय सिन्हा यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या १९८६ मध्ये माणदेशात आल्या. दुष्काळी माणदेशासाठी अहोरात्र कष्ट घेत महिला सक्षमीकरण, दुष्काळ हटाओ, क्रीडा, शैक्षणिक असे अनेक उपक्रम त्यांनी सुरु केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी 'माणदेशी रेडिओ' या माध्यमातून माणदेशाचे नाव जगभर पोहोचवले. त्यांनी १९९६ मध्ये माणदेशी फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनतर्फे ग्रामीण महिलांमध्ये अर्थसाक्षरता निर्माण केली. त्याही पलीकडे जाऊन १९९७ मध्ये माणदेशी महिला बँकेची स्थापना केली. माणदेशी उद्योगिनीच्या माध्यमातून २००६ मध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी हिशोब-हिंमत-हुशारी या त्रिसुत्रीवर पहिली व्यवसाय प्रशिक्षण शाळा सुरू केली. सिन्हा यांच्या रुपाने प्रथमच दाओस (स्वीत्झर्लंड) येथे २३-२६ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेचे सहअध्यक्षपद एका भारतीय महिलेला मिळाले. या कार्याची दखल घेत ग्रामीण भागातील भारतीय महिलांना स्वतःची वाट दाखवणाऱ्या चेतना सिन्हा यांना लोकमतच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
हे होतं परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.