मुंबई - सध्या यवतमाळचे जिल्हाधिकारीपद भूषवत असलेले आयएएस अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना 'बेस्ट आयएएस ऑफिसर म्हणून सन्मानित करण्यात आले. बुधवारी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. आयएएस अधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख हे सध्या यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या भरीव आणि नेत्रदीपक कामगिरीमुळे यंदाचा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्काराने देशमुख यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'कॉटन सिटी' अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे कॅपीटल अशी ओळख झाली. मात्र शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्यामुळे २०१८ या एका वर्षात या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा तब्बल १२९ नी कमी झाला आणि डॉ. राजेश देशमुख हे नाव राज्यभर झाले होते. एसबीआयने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास विलंब केला होता. वारंवार सांगूनही बँका कर्जपुरवठा करत नव्हत्या. आपल्या बँकेतली शासनाची सगळी खाती बंद करुन दुसऱ्या बँकेत शिफ्ट केली जातील असेही सांगून पाहिले पण एसबीआय सारखी बँक दाद देत नव्हती. तेव्हा देशमुख यांनी एसबीआयमधील १७ खाती बंद केली व २०० कोटी रुपये अन्य बँकांमध्ये वळवले. राज्यातला हा असा पहिला धाडसी निर्णय होता. मंत्रिमंडळ बैठकीत याचे पडसाद उमटले. परिणामी बँकेचे मुंबई व दिल्लीतील अनेक वरिष्ठ अधिकारी यवतमाळला आले आणि कर्जपुरवठ्यात दुप्पट वाढ झाली.
हे होते परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर हे परीक्षक मंडळ होतं.