देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय क्षेत्रातली उगवत्या नेतृत्वाला देण्यात येणार 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना सन्मानित करण्यात आले. वयाच्या १६व्या वर्षांपासून राजकारण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तांबे यांची वाटचाल आणि राजकीय प्रगल्भता थक्क करणारी आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात तांबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जन्मलेले तांबे यांच्या घरात मोठी राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब संतुजी थोरात तर मामा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आहेत. त्यांचे वडील पदवीधर मतदारसंघाचे आमदार असून आई संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आहेत. तांबे स्वतः जिल्हा परिषदेवर दोनवेळा निवडून आले असून त्यांनी कार्यकर्त्यापासून ते युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या कारकिर्दीत युवक काँग्रेसने केलेले योगासन आंदोलन विशेष गाजले आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या राहुल ब्रिगेडमध्येही त्यांचा समावेश होता. ते त्यांच्या जयहिंद युवा मंचातर्फे विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहेत. सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडणारा युवा नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. तांबे यांच्या कामाची दखल घेत भविष्यातील वाटचालीकरिता त्यांना उगवते नेतृत्व विभागात गौरविण्यात आले.
हे होतं परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.