लोकमान्य टिळक, बालगंधर्व यासारख्या व्यक्तिरेखा समर्थपणे मोठ्या पडद्यावर साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सुबोध भावे यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील डॉ. घाणेकरांच्या जबरदस्त भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्याला गौरवण्यात आलं.
सिनेमा, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमात लीलया काम करून रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला कलाकार म्हणजे सुबोध भावे. 'मला कोणतीही भूमिका द्या, मी ती माझ्या मेहनतीने आणि उत्तम अभिनयाने लोकांसमोर आणतो, उसमे क्या है...' यावर सुबोधची श्रद्धा. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटात प्रेक्षकांना दिग्गज अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्याचा प्रवास पाहायला मिळाला. या चित्रपटात सुबोधने डॉ. घाणेकर यांची भूमिका साकारली. तो ही व्यक्तिरेखा अक्षरशः जगला, अशीच प्रतिक्रिया समीक्षक आणि प्रेक्षकांनी दिली आहे. काशिनाथ घाणेकर यांचा लूक, संवादफेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकिरी, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड सुबोध भावेने ताकदीने साकारले आहे आणि हेच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडले. या सिनेमातील तिच्या निळ्या डोळ्यांचं तर विशेष कौतुक झालं.
हे होतं परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.