मुंबई- लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी तारकांचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. चित्रपट (स्त्री) या विभागातील नामांकने पुढीलप्रमाणे आहेत.
अश्विनी भावे - ध्यानिमनी, अभिनयअश्विनी भावे यांनी ‘शाब्बास सूनबाई’, ‘सरकारनामा’, ‘अशी ही बनवाबनवी’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘हिना’, ‘सैनिक’ या हिंदी चित्रपटात साकारलेल्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते, तसेच आर. के. बॅनर्सच्या ‘हिना’ या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले ‘आजावे माही...’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अश्विनी भावे यांनी केवळ मराठीतच नव्हे, तर बॉलीवूडमध्येदेखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. अश्विनी भावे लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यामुळे त्यांनी चित्रपटात काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले. अश्विनी सध्या त्यांच्या भूमिका खूपच चोखंदळपणे निवडत आहेत. अश्विनी यांनी ‘ध्यानिमनी’ या चित्रपटात शालू पाठकची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर असून, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘ध्यानिमनी’ या नाटकावर आधारित होता. आपल्या रक्तामांसाचं मूल हवं, असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते, पण प्रयत्न करूनही एखाद्या स्त्रीची मातृत्वाची आस जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा तिच्या जाणीव-नेणिवेच्या पातळीवर होणारी घालमेल मांडणारा ‘ध्यानिमनी’ हा चित्रपट आहे. आपला मुलगा शाळेच्या पिकनिकला गेला आहे आणि त्याला उशीर झाला आहे, तरी तो परतलेला नाही, म्हणून अस्वस्थ होणारी, अखंड बडबड करणारी शालू अश्विनी भावे यांनी खूपच चांगल्या प्रकारे सादर केली आहे. अश्विनी भावे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
निर्मिती सावंत - मला काहीच प्रॉब्लेम नाही, अभिनय‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’पासून ते ‘जाऊबाई जोरात’ या मालिकेपर्यंत रसिकांना खळखळून हसविणाऱ्या निर्मिती सावंत यांनी अनेक विनोदी भूमिका रंगविल्या. ‘जाऊबाई जोरात’, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘श्री बाई समर्थ’ ही नाटकं असोत की, ‘कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक’, ‘जाडूबाई जोरात’ या कलाकृती त्यांनी आपल्या खुमासदार विनोदाने रंगविल्या. ‘बिनधास्त’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘काय द्याचं बोला’, ‘खबरदार’, ‘अय्या’, ‘चल धर पकड’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. सतत मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत, आपल्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुणाईचे प्रॉब्लेम्स आणि त्यावर कसा तोडगा ही तरुणाई काढू शकते, याचे चित्रण मला काहीच प्रॉब्लेम नाही, या चित्रपटात पाहायला मिळते. निर्मिती सावंत यांनी मला काहीच प्रॉब्लेम नाही, या चित्रपटात नागपूरमध्ये राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारली आहे. त्या मूळच्या कोकणातल्या असल्याने त्यांना या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. वऱ्हाडी साज पकडायचा, तर तो पूर्णपणे शिकूनच या त्यांच्या हट्टापायी त्यांनी संपूर्ण स्क्रिप्ट त्यांच्या एका मैत्रिणीकडून फोनवर रेकॉर्ड करून घेतली होती आणि ती सतत ऐकत, त्यांनी वऱ्हाडी भाषेचा साज, लहेजा, हेल शिकला. प्रेक्षकांना निर्मिती सावंत यांची ही वऱ्हाडी व्यक्तिरेखा प्रचंड भावली. निर्मिती सावंत यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
पूजा सावंत, भेटली तू पुन्हा, अभिनयक्षणभर विश्रांती या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिदीर्ची सुरुवात करणाऱ्या पूजा सावंतने फार कमी वेळात मोठे यश मिळविले. ‘झकास’ या चित्रपटामुळे तर पूजा सावंत हे नाव मराठी सिनेरसिकांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत जाऊन बसले. यानंतर, आलेल्या ‘सतरंगी रे’, ‘पोस्टर बॉईज’, ‘गोंदण’, ‘सांगतो ऐका’, ‘दगडीचाळ’, ‘वृंदावन’, ‘चीटर’, ‘लव्ह एक्स्प्रेस’, ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटात पूजाने आपला वेगळा ठसा उमटविला. एखादी व्यक्ती आवडली, तर पहिल्याच नजरेत आवडते, असे म्हणतात. पहिल्याच भेटीत तिच्याशी जन्मोजन्मीचे नाते निर्माण होते. या पहिल्याच नजरेत घडणाऱ्या प्रेमाबद्दल खूप काही लिहिले, बोलले गेले आहे. प्रेम जरी आयुष्यात एकदाच होत असले, तरी एकाच व्यक्तीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडण्याची जादू काही औरच असते, हीच जादू प्रेक्षकांना ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटात अनुभवायला मिळते. पूजा सावंतने या चित्रपटात अश्विनी सारंगची भूमिका साकारली आहे. अतिशय मनमोकळ्या स्वभावाची अश्विनी या चित्रपटात खूप धमालमस्ती करताना दिसते. बेधडक, मस्तमौला अश्विनी पूजाने खूपच चांगल्या प्रकारे रंगविली असून, एक वेगळी पूजा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाली. पूजा सावंत यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
सोनाली कुलकर्णी, गुलाबजाम, अभिनय सोनाली कुलकर्णीने आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने अनेक दमदार आणि आशयघन भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘दिल चाहता है’, ‘मिशन काश्मीर’, ‘सिंघम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘अंग बाई अरेच्चा २’, ‘देऊळ’, ‘पुणे ५२’ या मराठी चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. मराठमोळे जेवण शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या आदित्य आणि डबा बनवणाऱ्या, राधा यांची कथा प्रेक्षकांना ‘गुलाबजाम’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. राधा ही अतिशय अबोल, आपल्यात रमणारी असते. बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क खूपच कमी असतो. राधाने आपल्याला जेवण बनवायला शिकवावे, अशी आदित्यची इच्छा असते, पण राधा या गोष्टीसाठी तयारच नसते, पण अनेक प्रयत्नाने आदित्य राधाला तयार करतो. राधाकडून जेवण शिकत असताना, राधा आणि आदित्य अधिकाधिक वेळ एकमेकांसोबत घालवायला लागतात आणि त्यांच्यात खूप छान मैत्री होते. त्या दोघांचाही एक भूतकाळ असतो. हा भूतकाळ ते सगळ्यांपासून लपवून ठेवत असतात, पण काही काळाने ते दोघेही आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एकमेकांसमोर मांडतात. आदित्य आणि राधाचे हे नाते कसे उलगडत जाते, हे खूप चांगल्याप्रकारे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. अबोल, आपल्याच जगात रमणाऱ्या राधाची भूमिका सोनालीने खूपच छानप्रकारे साकारली आहे. तिच्या अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. या चित्रपटात सोनालीने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या हृदयास भिडली होती. सोनाली कुलकर्णी यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
सुमित्रा भावे, कासव, दिग्दर्शक१५ चित्रपट, ६०-७० लघुपट, पाच दूरदर्शन मालिका अशा अनेक कलाकृती आज सुमित्रा भावे यांच्या नावावर आहेत. ‘दोघी’, ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘संहिता’, ‘अस्तू’, ‘कासव’ या सुमित्रा भावे यांच्या अजरामर कलाकृती आहेत. ६४व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘कासव’ या मराठी चित्रपटाने सुवर्णकमळ मिळविले आहे. सध्याच्या धकाधकीच्या दुनियेत आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आज अनेक जण डिप्रेशनचा सामना करत आहेत. याच डिप्रेशनवर आधारित ‘कासव’ या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत, पण दिग्दर्शकाने कलाकारांच्या अभिनयातून प्रत्येक दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले आहे. ‘कासव’ या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, चित्रपटात टिपलेला कोकणचा परिसर, चित्रपटाची कथा या सगळ्यांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. या चित्रपटात अलोक राजवाडे आणि इरावती हर्षे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात आलोकला खूपच कमी संवाद असले, तरी त्याने त्याच्या देहबोलीतून आणि अभिनयातून ही भूमिका ताकदीने रंगविली आहे. सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनामुळेच कलाकारांना आपल्या भूमिका तितक्या ताकदीने साकारता आल्या आहेत. सुमित्रा भावे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php