शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; लोककल्याणाचा वसा घेतलेल्या समाजसेवकांना आजच मत द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 3:19 PM

समाजाच्या तळागाळातील प्रत्येक स्तरात काम करुन वंचितांना उभारी देणाऱ्या या समाजसेवकांना सलाम करण्याची लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्काराच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे.

मुंबई- समाजाचा गाडा सतत चालता ठेवण्यासाठी असंख्य लोक अनेक क्षेत्रात महाराष्ट्रात कार्यरत आहेत. न बोलता, कोणताही गाजावाजा न करता या लोकांचं काम अव्याहत सुरु आहे. समाजाच्या तळागाळातील प्रत्येक स्तरात काम करुन वंचितांना उभारी देणाऱ्या या समाजसेवकांना सलाम करण्याची लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्काराच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. या पुरस्कारासाठी लोकसेवा-समाजसेवा वर्गासाठी खालील नामांकनांपैकी एक पर्याय निवडून आपण लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या संकेतस्थळावर मत नोंदवू शकता. 

1) दिनकर तुकाराम कांबळे (जीवरक्षक - कोल्हापूर)जेव्हा कठीण काळ येतो. त्यातून बाहेर पडणे अशक्य वाटू लागते. पण तुमच्याकडे जिद्द, निश्चय आणि निर्धार असेल तर तुम्ही त्यावर मात करू शकता. या विचारांची सत्यता पहावयाची असेल तर तुम्हाला कोल्हापूरचे जीवरक्षक दिनकर कांबळे यांना भेटावे लागेल. कारण त्यांचा जीवनप्रवासच तसा खडतर आणि आव्हानांवर मात करणारा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी कांडगावचे दिनकर तुकाराम कांबळे सहा भावंडापैकी एक. सगळे मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावायचे. वहिनीला बाळंतपणात हिस्टेरिया झाला आणि ती अर्धवट खणलेल्या विहिरीत पडली; कोणीही तिला बाहेर काढायला तयार होईना. शेवटी दिनकर यांनीच पेरूच्या झाडावर चढून अंदाज घेतला आणि तिचा मृतदेह बाहेर काढला. तेव्हा ते २२ वर्षांचे होते. या घटनेनंतर त्यांनी निश्चय केला की, अशी वेळ कुणावर येऊ द्यायची नाही. तेव्हापासून त्यांनी स्वत:ला या कार्यात झोकून दिले. सातवीत असताना त्यांनी शाळा सोडली होती; पण नंतर जीवरक्षक आणि फूटपाथवर मेकॅनिकचे काम करता-करता त्यांनी दहावी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कोल्हापुरातच नव्हे तर अन्य जिल्ह्यातही जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती ओढावते, काही अघटित घडते तेव्हा पहिल्यांदा आठवण येते ती दिनकर कांबळे यांची. आपल्या जीवाची पर्वा न करता ते पूर, अग्नितांडव, खोल विहीर, डोंगरदऱ्यामध्ये जिवंत अथवा मृतावस्थेत असलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम करतात. त्यामुळे पोलीस ,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित व्यक्ती व नातेवाईकांसाठीही ते ‘देवदूता’पेक्षा कमी नाहीत. पोलीस आपत्ती व्यवस्थापन विभाग किंवा नागरिकांकडून एक फोन आला की ते हातातले काम टाकून मदतकार्यासाठी धाव घेतात. अपघात, आत्महत्या, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती, पूर, माळीणची घटना, कुणकेश्वर, महाड येथील भूस्खलन, मांढरदेवसारख्या दुर्घटनांमध्ये अडकलेल्या जखमी व्यक्तींची सुटका व मृतदेह काढण्याचे कार्य त्यांनी केले. गेली २८ वर्षे ते हे काम विनामूल्य करत आहेत. त्यांनी आजवर ६५० जणांना जीवदान दिले आहे. जंगली हिंस्त्र प्राणी, पशु-पक्षी चुकून लोकवस्तीत येतात. काही कारणाने जखमी होतात. दिनकर कांबळे यांनी अशा अनेक जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले आहे. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मृत्यू पावलेले तसेच खून करून टाकलेले असे असे जवळपास ४ हजार मृतदेह काढून प्रशासनाला व नागरिकांना मदत केली आहे. हे काम करत असताना ते जवळपास नऊवेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले आहेत. ‘आपत्कालिन रेस्क्यू जीवरक्षक’ अशी त्यांची ओळख आहे. ते कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे सदस्य आहेत. राज्यातील विविध शहरांत जाऊन ते विद्यार्थ्यांना रेस्क्यू ट्रेनिंग देतात. कन्यागत महापर्व काळ, जनकल्याण महायाग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर यात्रा अशा गर्दीच्या ठिकाणी ते आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून काम पाहतात. क्युबा रेस्क्यू मास्टर ड्रायव्हर कोर्स (ऑस्ट्रेलिया), एनडीआरएफ (पुणे) येथे प्रशिक्षण पूर्ण, डिझास्टर मॅनेजमेंट, लाईफगार्ड कोर्स, रडार इंडिया पर्सनल सर्च आणि टीम सिक्युरिटी कोर्स अशा विविध प्रशिक्षणात सहभाग. नवे कार्यकर्ते घडावेत यासाठी त्यांनी डिझास्टर रेस्क्यू लाईफगार्ड सोसायटी या संस्थेची स्थापना केली असून प्रशिक्षणाद्वारे त्यांनी अनेक स्वयंसेवक व कार्यकर्ते घडविले आहेत. गॉडफ्रे फिलिप्स ब्रेव्हरी अवॉर्ड (दिल्ली),राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीतर्फे ‘स्टार मेडल’, शाहू महाराज समाजजागृती पुरस्कार (नागपूर), नेहरु युवा केंद्र कोल्हापूरचा ‘युवा पुरस्कार’, जीवरक्षक सिल्व्हर मेडल ब्रेव्हरी (अकलूज) अशा विविध पुरस्कारांनी दिनकर कांबळे यांना गौरविण्यात आले आहे. 

दिनकर कांबळे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

2) हर्षल सुभाष विभांडीक (डिजिटल इंडियासाठी धडपड, धुळे)दहा वर्षे न्यूयॉर्कसारख्या उचभ्रू शहरात बँकिंग क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करीत असताना देशप्रेमाची प्रेरणाज्योत मनात जागवत डिजिटल इंडिया ग्रामीण भागात प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करण्याचे ठरवून हर्षल विभांडीक मायदेशी परतला. खेडोपाडी हिंडून गावकरी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आपला अमूल्य वेळ आणि आर्थिक सहकार्य डिजिटल शाळा उपक्रमासाठी दिले. आपल्या १० वर्षाच्या अमेरिकेतील वास्तव्यात राष्ट्रपती बराक ओबामा यांना शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना हर्षल नेहमी ऐकत असे, त्यावेळेस ओबामा नेहमी अमेरिकेतील विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील त्यांची स्पर्धा ही भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांशी असल्याचे म्हणत असत, परंतु वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे; अमेरिकेच्या शिक्षण पद्धतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जातो याउलट भारतात आम्ही अजूनही दप्तराचे ओझे याविषयावरून वाद घालतो आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागात डिजिटल वगार्साठी लागणाऱ्या एकूण निधीचा ३०% भाग हर्षल, त्याचे अमेरिकेतील मित्र आणि लुपिन फौंडेशन यांनी पुरविला आणि उर्वरित ७०% निधी लोकसहभाग, शिक्षकसहभाग आणि माजी विद्यार्थ्यांची आर्थिक मदत यातून उभारण्यात आला. लोकसहभागातून निधी उभारण्यासाठी हर्षल विभांडीक यांनी गावोगावी प्रेरणासभा घेतल्या. १८ महिन्यात हर्षलने धुळे जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक खेड्यात फिरून, २५०पेक्षा अधिक प्रेरणासभा घेतल्या आणि त्यातून धुळ्यासारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात लोकसहभागातून ७.२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा झाला आणि १८ महिन्यात ११०३ जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल वर्ग होऊन, धुळे जिल्ह्याने या क्षेत्रात राज्यात आघाडी घेतली आहे. प्रेरणा सभांच्या माध्यमातून घडून येत असणारी महत्वाची गोष्ट म्हणजे नुसती शाळा डिजिटल होत नसून, शाळेचे रूप बदलविण्यास गावकऱ्यांची मदत होत आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या आर्थिक सहभागामुळे ते जातीने शाळेतील विविध उपक्रमात सहभागी होत आहते. आदिवासी ग्रामीण भागांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये हजेरी, पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसाठी याची मदत होत आहे. धुळ्यापाठोपाठ हर्षलने महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यामध्ये ३६ जिल्हास्तरीय प्रेरणासभाद्वारे जिल्हा परिषद शिक्षक आणि ग्रामसेवकाना संबोधित केले आहे. हर्षलच्या प्रेरणासभांना हजारोच्या संख्येने शिक्षक आणि ग्रामसेवक उपस्थित राहात असून लोकसहभाग, शिक्षकसहभाग आणि ग्रामसेवकांच्या मदतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल होण्यास राज्यभरात गती मिळाली आहे.

हर्षल विभांडिक यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

3) डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे (माऊली सेवा प्रतिष्ठान, अहमदनगर) अन्याय, अत्याचार आणि बलात्काराच्या शिकार झालेल्या बेवारस मनोरुग्ण महिलांची आयुष्यभर सेवा, सुश्रुषा करण्याचा वसा डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे या दाम्पत्याने घेतला आहे़ वैद्यकीय व्यवसायातून बक्कळ पैसा कमावण्याची संधी नाकारत या दाम्पत्याने आपले आयुष्य बेवारस मनोविकलांग महिला आणि त्यांच्या मुलांसाठी वाहिले. त्ययासाठी ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था सुरू केली. १९९८ साली या संस्थेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. सुरुवातीच्या काळात डॉ. धामणे यांनी अनाथांची सेवा केली. हे करीत असताना त्यांना रस्त्यांवर फिरणा-या मनोरुग्ण महिलांच्या विदारक आयुष्याची ओळख झाली. पुढे डॉ. धामणे यांनी त्यांचे आयुष्य अशा बेवारस, अत्याचारित मनोरुग्ण महिलांसाठी वाहिले. २००५ पासून डॉ. धामणे यांनी मनोरुग्ण महिलांची सेवा करण्याचा ध्यास घेतला. या महिलांना अनेक गंभीर स्वरुपाचे आजार असतात. त्यांच्यावरील उपचार, शस््त्रक्रियाही खूप महागड्या असतात. त्यामुळे डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे यांनी पहिल्यांदा वडिलोपार्जित जागेवर काम सुरु केले. नगर-मनमाड महामार्गावरील शिंगवे येथे नवीन रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, ५ खाटांची सोय असलेला अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब सुरु केली. अत्याधुनिक उपकरणे घेतली. या मनोरुग्ण महिला कोठेतरी रस्त्यावर फिरत असताना त्यांच्यावर अत्याचार होतात, बलात्कार होतात. त्या गरोदर राहतात. अशा महिला संस्थेत आल्यानंतर त्यांच्यावरील महागडे उपचार, बाळंतपण डॉ. धामणे दाम्पत्य करतात. डॉ.सुचेता यांच्या गळ््यातील मंगळसूत्र या महिला कुतूहलाने पहायच्या. मंगळसूत्राबद्दल त्यांनाही औत्सुक्य वाटायचे. त्या मंगळसूत्राबद्दल प्रश्नही विचारायच्या. त्यामुळे या महिलांची खंत डॉ. सुचेता यांच्या लक्षात आली अन् त्यांनी स्वत: गळ्यातील मंगळसूत्राचा त्याग करुन या महिलांसारखे विनाअलंकार राहण्याचे ठरविले. या कार्यासाठी अनेक दानशूरांनीही या दाम्पत्याला मदत केली. माऊली संस्थेत सध्या ११५ मनोरुग्ण महिला आहेत. तसेच मनोरुग्ण महिलांची १९ मुले आहेत. मनोरुग्ण महिलांची मुले दत्तक देता येत नाहीत. त्यामुळे ही मुलेही डॉ. धामणे दाम्पत्य सांभाळत आहेेत. या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि संगोपनाची जबाबदारीही डॉ. धामणे दाम्पत्याने उचलली आहे. रस्त्यावरील अनेक मनोरुग्ण महिलांना संस्थेत आणून त्यांच्यावर उपचार करुन त्यांना पूर्णपणे बरे करण्यात आले. उपचारानंतर सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील, अशा ३५ महिलांना संस्थेने त्यांच्या घरी पोहोचविले. मात्र त्यामधील ३० महिलांचा घरी योग्य काळजी न घेतल्यामुळे व आजारांमुळे मृत्यू झाला. यामुळे ५ महिलांना त्यांनी परत आपल्या संस्थेत आणले आणि भविष्यात या महिलांना घरी न पाठविण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या शेवटपर्यंत या महिलांना सांभाळण्याची जबाबदारी माऊली संस्थेने घेतली. अशा १२५ महिलांचे संस्थेतच देहावसान झाले असून त्यांच्यावर संस्थेने अंत्यसंस्कार केले. सध्या संस्थेने नगर-मनमाड महामार्गावर देहरे (ता. नगर) येथील टोलनाक्याजवळ ३ एकर जागेवर २५ कोटी रुपये खर्चाचा ६०० खाटांचा ‘मनगाव प्रकल्प’ (मनोरुग्ण महिलांसाठी अद्ययावत रुग्णालय, निवास) हाती घेतला आहे. यातील पहिला १५० खाटांचा प्रकल्प दानशूरांमुळे पूर्ण झाला आहे. मनोरुग्ण महिला, त्यांची मुले यांच्या मनोरंजनासाठी संस्थेने एक स्वतंत्र सभागृह उभारले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन रोटरी इंटरनॅशनलने २०१६ मध्ये १ लाख अमेरिकन डॉलरचा पुरस्कार देऊन धामणे यांना गौरविले आहे. 

डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचेता धामणे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

4) सुनील पोटे (युवा मित्र - नाशिक)युवा मित्र ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात लोणारवाडी या गावी कार्य करणारी संस्था. या संस्थेने जलसंपत्ती नियोजन, कृषी आणि जीवन विकास तसेच गुणवत्ता विकास ही उद्दिष्ट्येसमोर ठेवून सन २००१ मध्ये आपल्या कार्याला प्रारंभ केला. सुनील पोटे आणि मनीषा पोटे या दोघांनी शिक्षण या साध्या विषयाला घेऊन सुरुवात केली. पारंपरिक आणि शालेय शिक्षण यांची जोड घालणारा क्षणोक्षणी हा उपक्रम त्यांनी दोन गावात केला. शाळाबाह्य मुलांना रोजगाराभिमुख शिक्षण देणारा हा उपक्रम सध्या ३१९ गावांमध्ये सुरू आहे. आज महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यातील विविध सामाजिक विकास संस्थांच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे. आपल्या कामासाठी तांत्रिक सहकार्य, साधन संपत्तीची उभारणी आणि प्रशिक्षण ही कार्ये संस्था करीत आहे. परिसरातील गावे आणि नाशिक जिल्ह्यात लोकसहभागातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. सिन्नर तालुक्यातील देवनदीवर ब्रिटिशांच्या राजवटीत सन १८७० मध्ये बंधारे बांधून सिंचनाची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या या बंधाऱ्याची दूरवस्था झाली असून त्यामधून पाणी वाया जात होते. हे बंधारे सुधारून सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न संस्थेने लोकसहभागातून केला. सन २०१५ मध्ये मुंबईच्या टाटा ट्रस्टबरोबर सहकार्य सुरु झाल्याने संस्थेचे कार्य वेगाने विकसित झाले. संस्थेने आतापर्यंत २० ब्रिटीशकालीन बंधाऱ्याचे लोकसहभागातून पुनरूज्जीवन करून दुष्काळग्रस्त भागाला सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जिल्ह्यातील दहा तालुक्यात २७६ बंधारे पुनरूज्जीवनाचे काम संस्था करीत आहे. तसेच ६७ बंधारे गाळमुक्त केले आहेत. राज्यातील पहिली देवनदी व्हॅली अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून मॉलला शेतमाल पुरवणाऱ्या या संस्थेने महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये एकूण १५ कंपन्या सुरू केल्या आहेत. दोन हजार मागास, विधवा आणि परित्यक्ता महिलांची सावित्रीबाई गोट प्रोड्युसर कंपनी सुरू केली आहे. या शिवाय मुलांना आनंददायी शिक्षण देणारे वीकेण्ड स्कूल, सोशल टुरिझम आणि किशोरवयीन मुलींसाठी देखील ही संस्था विशेष प्रकल्प राबवित आहे. संस्थेला आजपर्यंत विविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्राज महाइंटरप्रिनरशिप अ‍ॅवॉर्ड २०१२, झी अनन्या सन्मान २०१२, एक्सलन्स इन इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड २०१२, महिंद्र समृद्धी सन्मान २०१४ हे यापैकी काही महत्त्वाचे पुरस्कार होत.

सुनील पोटे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

5) शांतिलाल गुलाबचंद मुथ्था (पुणे)सकारात्मक सामाजिक बदलासाठी उद्यमशीलतेचे बीज पेरणारे शांतिलाल मुथ्था ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळखले जातात. अत्यंत नम्र असलेले मुथ्था गेली ३० वर्षे सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करत आहेत. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्ही (ता.पाटोदा) या लहानशा गावात झाला. त्यांची घरची आर्थिक परिस्थती अतिशय बेताची, सहा महिन्यांचे असतानाच आईचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे वडील प्रवरानगर साखर कारखान्यावर जाऊन, तेथील छोट्या वस्तीमध्ये किराणा दुकान चालवायचे. आईचे निधन झाल्यामुळे शांतिलाल मुथ्था यांचे ११वीपर्यंतचे शिक्षण बीड जिल्ह्यातील कडा येथे अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ या वसतिगृहामध्ये झाले. वसतिगृहामध्ये शिक्षण घेत असताना, जैन समाजातील मोठ्या विवाह सोहळ्यामध्ये वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांना वाढपी म्हणून बोलाविले जात होते व त्यातून वसतिगृहाला देणगी मिळत होती. अशा प्रकारच्या मोठ्या लग्नसोहळ्यातील वाढपीचे काम त्यांनी चार वर्षे केले. त्या वेळी जैन समाजातील विवाहप्रसंगी होणारा अवाढव्य खर्च पाहून त्यांचे मन विचलित होई. त्याच वेळी त्यांनी लग्नातील खर्च कमी करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथे आल्यानंतर, वसतिगृहात प्रवेश घेऊन खासगी नोकरी करत १९७६ साली बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, इस्टेट एजंटचा व्यवसाय सुरू केला. त्यातून जनसंपर्क वाढल्यामुळे त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. ७-८ वर्षे बांधकाम व्यवसाय अतिशय सचोटीने केल्यानंतर, वयाच्या ३१व्या वर्षी आयुष्यभर सामाजिक कार्य करण्याचा निर्धार करून ते या व्यवसायातून निवृत्त झाले. लहानपणापासून विवाहातील अनावश्यक खर्च कमी व्हावा, अशी इच्छा असल्यामुळे, त्यासाठी जनजागृती आणि कौटुंबिक समस्यांवर कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह, बिना हुंड्याचे विवाह, मुलींच्या घटत्या संख्येवर जनजागृती इत्यादी कामे वेगाने सुरू केली. सुरुवातीला जैन समाजाचे २५, ५१ व १०० सामूहिक विवाह आयोजित करून, संपूर्ण महाराष्ट्रात ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ३००० कि.मी. पदयात्रा केली. त्यानंतर, महाराष्ट्रामध्ये सर्व जाती-धर्मामध्ये वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सातत्याने होऊ लागले. १९८५ साली सर्व जाती-धर्माचे ६२५ सामूहिक विवाह पुणे येथील एस.पी. प्रांगणात आयोजित करण्यात आले. बघता-बघता एका छोट्या कार्याचे रूपांतर देशभरच्या चळवळीमध्ये झाले. १९८५ साली त्यांनी भारतीय जैन संघटनेची स्थापना केली. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन १९९३ च्या लातूर भूकंपात मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करीत असताना, तेथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी १,२०० भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी पुणे येथे आणले व भारतीय जैन संघटनेचा वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पातून लातूरची मुले गेल्यानंतर, मेळघाट व ठाणे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सातत्याने आणले गेले. जमू-काश्मीर भूकंपातील ५०० विद्यार्थांना शिक्षणासाठी पुण्यात आणले. गेल्या तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या ६०० मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन यशस्वीपणे सुरू आहे. या विद्यार्थ्यांसाठी या प्रकल्पामध्ये ‘मेंटल हेल्थ’ विभागाची स्थापना करण्यात आली आहे. लातूर भूकंपानंतर २००१ च्या गुजरात भूकंपामध्ये त्या ठिकाणी चार महिने राहून, ३६८ शाळा बांधून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुजरात सरकारला सुपुर्द करण्यात आल्या. या माध्यमातून १ लाख २० हजार विद्यार्थांची तीन महिन्यांत शाळेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली. २००५ मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये तामिळनाडू व अंदमान-निकोबार येथे मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. जमू-काश्मीरच्या भूकंपात एका महिन्यात १५ हजार लोकांची राहण्याची व्यवस्था एनडीएमए यांच्याबरोबर करार करून करण्यात आली. नेपाळ भूकंपात तीन महिने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करण्यात आले. महाराष्ट्राच्या दुष्काळामध्ये दरवर्षी सातत्याने कार्य केले जात आहे. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील ११७ तलावातून २० लाख क्युबिक मीटर गाळ काढून एक उच्चांक प्रस्थापित करण्यात आला. एप्रिल-मे २०१७ मध्ये ‘पानी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर श्रमदान करणाऱ्या ४०० गावांमध्ये ४९० जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने कठीण काम करून दिले. सन २००३ मध्ये भारतातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी व मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. यासाठी अधिस्वीकृती, शिक्षक प्रशिक्षण, मुख्याध्यापक प्रशिक्षण, पालक व इतर घटकांबरोबर संवाद असे वेगवेगळे मोड्युल्स तयार करून, महाराष्ट्र, गोवा, अंदमान-निकोबार, गुजरात, मध्य प्रदेश, मेघालय या राज्य सरकारबरोबर करार करून, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ठोस काम करण्याची संधी प्राप्त झाली. या सर्व अनुभवातूनच मूल्य शिक्षणावर आधारित मूल्यवर्धन कार्यक्रमाची निर्मिती २००९ मध्ये झाली. बीड जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांतील ३५ हजार विद्यार्थ्यांबरोबर या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. सात वर्षांत या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या मूल्यमापनातून विद्यार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडत दिसून आले. या सर्व अनुभवावरून २०१५ मध्ये मूल्यवर्धनचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने हा आराखडा २०१६ पासून ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका केंद्रात सुरू केला आहे. २०१७ मध्ये त्याची व्याप्ती १०७ तालुक्यांतील २० हजार शाळांमधून १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या कामी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन शासनाला विनामूल्य सहकार्य करीत आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम म्हणजे, जिल्हा परिषद शाळांतील मोठे परिवर्तन ठरणार आहे. महाराष्ट्राबरोबरच गोवा राज्याच्या सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये मूल्यवर्धन दोन वर्षांपासून सुरू आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून यशस्वी झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

शांतीलाल गुलाबचंद मुथ्था यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php

टॅग्स :Lokmat Maharashtrian Of The Year 2018लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८