मुंबई : मराठी वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’ हाच सर्वांत आकर्षक ब्रँड ठरला आहे. ब्रँडची विश्वासार्हता आणि आकर्षकताया निकषांवर ब्रँडचे मूल्यांकन करून, ‘टीआरए रिसर्च’ या कंपनीने देशभरातील एक हजार प्रभावी ब्रँडची यादी जाहीर केली आहे. त्यात मराठी वृत्तपत्रांच्या गटात ‘लोकमत’लाच नागरिकांनी पसंती दर्शविल्याचे दिसून आले आहे.‘टीआरए रिसर्च’ या कंपनीने सलग चौथ्या वर्षी आकर्षकता व प्रभावाच्या ३६ विविध निकषांवर अभ्यास करत, विविध गटांतील देशातील सर्वांत लोकप्रिय ब्रँड्सची निवड केली आहे. यंदा कंपनीने देशातील १६ महानगरांमधील ग्राहकांशी चर्चा करून, पाच हजार ब्रँड्सबाबत व्यापक सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल मंगळवारी मुंबईत प्रकाशित करण्यात आला.कंपनीचे कार्यकारी संचालक सचिन भोसले म्हणाले की, कंपनीने वृत्तपत्रे, आॅटोमोबाइल्स, टेक्नॉलॉजी, इंटरनेट, टेलिकॉम, सौंदर्यप्रसाधने, घरगुती विद्युत उपकरणे, रिटेल्स, आरोग्य क्षेत्र अशा २० गटांतील ब्रँडचे मूल्यांकन सर्वेक्षणात केले. त्यात सलग यंदाही आकर्षक ब्रँडच्या यादीत ‘लोकमत’ने वाचकांना भुरळ घातलेली असल्याचे दिसून आले आहे. या वेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौळी यांनी सांगितले की, महानगरांमधील २० हजार रुपयांहून अधिक वेतन असलेल्या २१ ते ५० या वयोगटांतील ग्राहकांची मते सर्वेक्षणामध्ये विचारात घेण्यात आली. मुलाखत घेतलेल्या प्रत्येकाकडे स्वत:चे व्हिजिटिंग कार्ड आहे का? याचीही पडताळणी करण्यात आली. ग्राहकाची क्रयशक्ती व पत अशा बाजूंचा विचार करून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
मराठी वृत्तपत्रांत ‘लोकमत’ अव्वल, ‘टीआरए’चे सर्वेक्षण; सर्वांत आकर्षक ब्रँड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 6:48 AM