मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अन् अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि गोव्यात पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे आपले लाडके ‘लोकमत’ वृत्तपत्र आता देशभरातही सर्वात आकर्षक आणि वाचकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरणारा ब्रँड ठरला आहे. विविध कंपन्यांच्या ब्रँडचे देशभरात सर्वेक्षण करणाऱ्या ‘टीआरए’ या अग्रगण्य कंपनीने एकूण दहा हजार ब्रँडस्चा अभ्यास करून त्यातील मुद्रित माध्यमांमध्ये ‘लोकमत’ला अव्वल ठरविले आहे.
विशेष म्हणजे, विविध भाषांतील १४ सर्वांत आकर्षक वृत्तपत्रांच्या यादीत ‘लोकमत’खेरीज कोणत्याही मराठी वृत्तपत्राचा समावेश नाही. ‘टीआरए’ने गुरुवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या देशभरातील २७६ विभागांतील एक हजार ब्रँडस्ची उतरत्या क्रमाने केलेली मांडणी जाहीर केली. देशभरातील १६ प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर कॉम्निसंट समूहातील कंपनी ‘टीआरए’ने ‘लोकमत’ला अव्वल ठरविले. ‘टीआरए’ ही विविध क्षेत्रांतील ब्रँडचे ग्राहक सर्वेक्षणाच्या आधारे बाजारातील मूल्यांकन करणारी अग्रगण्य कंपनी असून, ‘सर्वात आकर्षक ब्रँड २०१६’ हा अहवाल तयार करण्यासाठी कंपनीने देशभरातील १६ महानगरांमधील ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या २ हजार ३३८ व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे.
तसेच ग्राहक आकर्षणासंबंधीची ३६ वैशिष्ट्येही विचारात घेण्यात आली आहेत. या प्रक्रियेत १० हजार ब्रँडचा अभ्यास करून त्यांचे गुणांकन करण्यात आले. त्यानंतर, एक हजार प्रभावशाली ब्रँडची यादी तयार करण्यात आली आहे. ‘ब्रँडचा आकर्षकपणा हे ग्राहकांना उत्पादनाकडे खेचून घेणारे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे,’ असे मत टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रामौली यांनी व्यक्त या वेळी केले.
इतर सर्व भाषांतील वृत्तपत्रेही मागे मुद्रित माध्यमांच्या विभागात समाविष्ट असलेल्या १४ ब्रँडस्मध्ये ‘लोकमत’ अग्रस्थानी आहे. इंग्रजीमधील हिंदुस्थान टाइम्स, द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, टाइम्स आॅफ इंडिया, एशियन एज, आऊटलूक, तसेच हिंदीमधील दै. भास्कर, नवभारत टाइम्स, अमर उजाला; तामिळमधील डेली थंथी आणि गुजरातीतील संदेश या सर्व ब्रँडना मागे टाकत ‘लोकमत’ने अव्वल स्थान पटकाविले आहे.
अन्य आकर्षक ब्रँड : सर्व विभागांच्या एकत्रित यादीमध्ये ‘एलजी’ हा देशभरातील सर्वात आकर्षक ब्रँड ठरला आहे. त्या खालोखाल सोनी, सॅमसंग, होंडा हे ब्रँड ग्राहकांमध्ये आकर्षक ठरले आहेत. पूर्णत: भारतीय उद्योग समूह असलेल्या बजाजने यंदाच्या यादीत सहावे स्थान मिळविले आहे, तसेच टाटा कंपनी सातव्या, मारुती सुझुकी आठव्या, एअरटेल नवव्या आणि नोकिया दहाव्या स्थानावर आहे.