ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - कुठल्याही परिस्थितीत मुंबईत महापालिकेत स्वबळावर सत्ता आणण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जो प्रचार केला जातोय, जी पावले उचलली जातायत ती त्यांच्या मूळ भूमिकेशीच विसंगत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेत दुय्यम भूमिका मिळाल्याने डिवचली गेलेली शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपाला जागा दाखवून देण्यासाठी शक्य त्या सर्व राजकीय चाली खेळत आहे.
मागच्या आठवडयात शिवसेनेने नरेंद्र मोदींचा कट्टर विरोधक आणि पाटीदार पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलला प्रचारासाठी मुंबईत आणले होते. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्याचे मातोश्रीवर स्वागत केले. मुंबईतील गुजराती मतांवर डोळा ठेऊन शिवसेनेने ही हार्दिक चाल खेळली. पण शिवसेनेचे हे पाऊल त्यांच्या मूळ भूमिकेशी विसंगत आहे.
हार्दिक पटेल दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपले प्रेरणास्त्रोत, आदर्श असल्याचे सांगतो. पण प्रत्यक्षात बाळासाहेबांना कधीच जाती-पातीचे राजकारण मान्य नव्हते. जातीवर आधारीत आरक्षणाला बाळासाहेबांनी नेहमीच प्रखर विरोध केला व तसे राजकारण शिवसेनेत होऊ दिले नाही. पण शिवसेनेने त्याच हार्दिक पटेलला आपलेसे केले.
आम्ही लोकमत ऑनलाइनच्या वाचकांना यासंबंधी प्रश्न विचारला होता. पालिका निवडणुकीत भाजपाला थोपवण्यासाठी हार्दिक पटेलची मदत घेणं शिवसेनेला शोभतं का? या पोलमध्ये 11 हजारपेक्षा जास्त वाचकांनी सहभाग घेतला. त्यातील 3500 पेक्षा जास्त वाचकांनी शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचे मत नोंदवले तर, 7500 पेक्षा जास्त वाचकांनी शिवसेनेने हार्दिकला आणून चूक केल्याचे मत नोंदवले. 244 जण तटस्थ राहिले.