पुणे : विविध वाङ्मयप्रकारांमध्ये दर्जेदार आणि अव्वल दर्जाच्या साहित्यकृती साकारणाऱ्या मराठी सारस्वतांचा सन्मान करण्यासाठी लोकमत समूहाच्या वतीने आयोजित मोहोर ग्रुप (भारत देसलडा व्हेंचर) प्रस्तुत ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ प्रदान समारंभ रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील हयात रिजेन्सी या पंचतारांकित हॉटेलमध्ये सायंकाळी ७ वाजता हा साहित्य सोहळा रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित असतील. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, सांस्कृतिक विभागाचे संचालक अजय आंबेकर उपस्थित राहणार आहेत. लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.‘लोकमत’ या महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या दैनिकाने मराठी साहित्यक्षेत्रामध्ये हे नवे पर्व सुरू केले आहे. सारस्वतांच्या गौरवाच्या परंपरेचे हे तिसरे वर्ष आहे. या पुरस्कार निवडीसाठी पारदर्शक प्रक्रिया राबविली जाते. वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा पुरस्कार निवडीसाठी विचार केला जातो. प्रकाशक व लेखकांनी पाठविलेल्या पुस्तकांमधून सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची निवड समिती नेमली जाते. मोठ्या थाटात आणि भव्य समारंभात या पुरस्कारांचे वितरण मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत केले जाते. या वर्षीदेखील अशाच भव्य स्वरूपात सारस्वतांचा ‘पंचतारांकित’ सन्मान केला जाणार आहे. निवड समितीने सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड निश्चित केली असून, लवकरच विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. साहित्यातील विविध वाङ्मयप्रकारांमधून पुस्तके निवडली जातात. या वर्षी कथा, कादंबरी, काव्य, ललित गद्य, ललितेतर गद्य, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक साहित्य, बालसाहित्य, अनुवाद, विज्ञान अशा एकूण १० वाङ्मयप्र्रकारांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक पुरस्कार हा २५ हजार रुपयांचा असून, उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी चित्रकाराला ११ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.एक लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार अभ्यास आणि विचारसाधनेला अवघे आयुष्य समर्पित करून साहित्यसेवेचा वसा जपलेली ज्येष्ठ साहित्यिकांची एक मोठी परंपरा मराठी साहित्याला लाभलेली आहे. त्यांनी त्यांच्या लेखनातून व विचारांतून मराठी साहित्य जगताला एक नवा आयाम मिळवून दिलेला आहे. नवी दिशा दिली आहे व नवे दरवाजे खुले केले आहेत. अशा समर्पित आयुष्याला मानाचा मुजरा म्हणून एका साहित्यक्षेत्रातील अमूल्य आणि प्रदीर्घ अशा योगदानाबद्दल एका ज्येष्ठ व प्रतिभावंत साहित्यिकाला 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येते. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळा २२ नोव्हेंबरला
By admin | Published: November 15, 2015 1:23 AM