पुणे - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सातत्याने चर्चेत असतात. अमृता यांनी गायलेलं गाणं असो वा एखादी राजकीय प्रतिक्रिया; त्यावरून बरंच ट्रोलिंग होतं. अमृता फडणवीसांनी वेळोवेळी ट्रोलर्सला उत्तरेही दिली आहेत. त्यांचा हाच बेधडकपणा, नीडरपणा आज 'लोकमत सखी डॉट कॉम'च्या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाला.
माझ्यावर कुणाचाही राजकीय दबाव नाही, माझ्यावर कुणी प्रेशर आणूही शकत नाही आणि मी कुणाला घाबरत नाही, असं अमृता फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. 'लोकमत सखी डॉट कॉम'च्या संपादिका मेघना ढोके यांनी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याची पत्नी इतक्या मोकळेपणाने सोशल लाईफ, सोशल मीडियात वावरताना दिसली, यातली आव्हानं काय होती? कधी कुणी तुम्हाला अडवलं का किंवा वरून काही पॉलिटिकल प्रेशर आले का?, असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, "मला घरातून कोणतंही प्रेशर नाही. मी जर कुठे चुकले तर मला घरचे सल्ला देतात आणि मी ते ऐकूनही घेते. त्यानुसार मी बदलही केले आहेत. माझ्यावर कुणाचा राजकीय दबाव नाही आणि मी तो घेतही नाही. परंतु घरच्यांनी मला दिलेला सल्ला नेहमी ऐकते."
त्याचसोबत सतत होणाऱ्या ट्रोलिंगवरही अमृता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. ट्रोलर्सचा सामना करण्यासाठी मला यासाठीचे बळ माझ्या घरातून मिळते. कोणतीही गोष्ट करताना मला त्याची प्रेरणा माझ्या अंतर्आत्म्यातून येते. आपण जे आहोत तसंच राहिले पाहिजे. कोणी काही म्हणालं तर त्याकडे मी लक्ष देत नाही, असा टोला त्यांनी टीकाकारांना लगावला आहे.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याच्या प्रायोजक ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या संचालक आणि प्रथितयश उद्योजिका उषा काकडे यांनी, स्त्रियांनी एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. स्त्रियांनी एकमेकींचा आदर केला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
विविध क्षेत्रातील २० यशस्विनींचा सन्मानचाकोरी मोडून आपण निवडलेल्या वाटेवर चालणे कधीच सोपे नसते. पायाखालची मळलेली वाट नाकारायची तर आत्मविश्वास आणि आशावाद हवा. हेच सारे सोबत घेऊन आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान 'लोकमत सखी डॉट कॉम' तर्फे करण्यात आला. पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगला. बँकर ते सिंगर असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अमृता फडणवीस, मराठी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा आणि ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या संचालक आणि प्रथितयश उद्योजिका उषा काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २० यशस्विनींचा गौरव करण्यात आला. कोहिनूर, सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिट्युशन यांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. लोकमान्य सोसायटी या सोहळ्याचे सहयोगी प्रायोजक होते.