मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (स्वच्छता) हा पुरस्कार लातूरमधील चिमाची वाडी गावचे सरपंच नाथराव रामराव बंडे यांना प्रदान करण्यात आला.
गट - स्वच्छतासरपंचाचे नाव - नाथराव रामराव बंडेगाव - चिमाची वाडीतालुका - उद्गीरजिल्हा - लातूर
गावात स्वच्छतेचे नियोजन...
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील चिमाची वाडी हे साधारण साडेपाचशे लोकसंख्येचे लहानसे गाव! केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करण्यापूर्वीपासूनच या स्वछतेचा वसा घेतला आहे. पाणंदमुक्ती, प्लास्टीकमुक्ती असे उपक्रम नेटाने राबवित गावाने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. गावात ७९ घरे असून त्यांच्यासाठी ७९ शौचालयेही बांधण्यात आली आहे. त्यात पाच सार्वजनिक शौचालयांचाही समावेश आहे. गाव पाणंदमुक्त करण्यासाठी केवळ शौचालये बांधून चालत नाही, तरग्रामस्थांना त्याच्या नियमित वापराची सवयही लावणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंड बसविला. त्यामुळे हळूहळू लोकांच्या सवयींमध्ये बदल होऊन गाव १०० टक्के पाणंदमुक्त झाले. गावात आरओ जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे ५ रुपये प्रति जार दराने ना नफा, ना तोटा तत्त्वावर पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येते. तसेच बंदिस्त गटारांद्वारे सांडपाणी शेतात सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याचा सिंचनासाठी पुनर्वापर होतो.गावाला २००५-०६ साली तत्कालीन राष्टÑपती डॉ. ण्. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गतही चिमाचीवाडीचा राज्यात तिसरा क्रमांक होता. तसेच यशवंत पंचायत राज पुरस्कार, स्वच्छ शाळा- सुंदर शाळा सानेगुरुजी पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, आण्णासाहेब खेडकर पुरस्कार, सलग तीन वेळा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार आदी पुरस्कारांनी गावाला गौरविण्यात आले आहे. याचे श्रेय सरपंच नाथराव रामराव बंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांना आहे.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.