मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी मेळघाटात कुपोषणासारख्या समस्यांचे मूळ अल्पवयीन मुलींच्या विवाहात आहे, असे लक्षात आल्यानंतर त्याविरोधात कंबर कसलेल्या अमरावती जिल्ह्यातील राणामालुर गावच्या सरपंच गंगाबाई राजमा जावरकर यांना ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (सुरक्षा) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गट - सुरक्षासरपंचाचे नाव - गंगाबाई राजमा जावरकरगाव - राणामालुरतालुका - धारणीजिल्हा - अमरावती
कुपोषणासारख्या समस्येवर लढा....
कुपोषण, दारिद्य्रग्रस्त मेळघाट परिसरातील राणामालुर हे लहानसे गाव! कुपोषणासारख्या समस्यांचे मूळ अल्पवयीन मुलींच्या विवाहात आहे, हे गावातील गंगाबाई राजमा जावरकर या मेळघाटच्या वाघिणीच्या लक्षात आले आणि तिने त्याविरोधात कंबर कसली. शासकीय यंत्रणांचे साहाय्य घेऊन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिच्या बेधडक स्वभावामुळे अनेक अल्पवयीन मुली आणि तरुणींची तिने शोषणापासून मुक्तता केली. तसेच महिलांचे बचत गट तयार करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले.स्वकर्तृत्वावर सरपंच पदापर्यंतचा टप्पा गाठल्यानंतर गंगाबाईने गावासाठी स्वप्नवत असणाऱ्या अत्याधुनिक शिक्षण, प्रगतीशील शेती या गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्याचे काम यशस्वीरित्या केले. तिच्या पुढाकाराने राणामालुरमध्ये डिजिटल शाळेचे स्वप्न साकार झाले. ई-शिक्षणासाठी शाळेला साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. टीव्ही, प्रोजेक्टर आदी माध्यमातून विविध शैक्षणिक संज्ञा शिकणे विद्यार्थ्यांना सोपे झाले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शाळेत शुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन पटसंख्या वर्षभरात घसरली नाही.मुलींचा शाळेतील टक्का वाढविण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांमुळे, तसेच गंगाबार्इंचा आदर्श त्यांच्या पुढे असल्यामुळे गावातील शाळेत आज मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. तसेच प्रगतीशील, अत्याधुनिक शेतीसाठीही गंगाबाई यांनी प्रयत्न केले. ठिबक सिंचनाच्यामाध्यमातून जमीन ओलिताखाली आणली. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना प्रयोगशील महिला शेतकरी पुरस्कार, राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.