मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (कृषी) हा पुरस्कार साता-यातील अनपटवाडी गावचे सरपंच मनोज मधुकर अनपट यांना प्रदान करण्यात आला.
गट - कृषीसरपंचाचे नाव - मनोज मधुकर अनपटगाव - अनपटवाडीतालुका - कोरेगावजिल्हा - सातारा
गावातील पाणी टंचाईवर मात ...
पश्चिम महाराष्ट्रातील अनपटवाडी हे एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेले गाव, आज टँकरमुक्त झाले आहे. याचे श्रेय लोकसहभागातून येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांना द्यावे लागेल. सरपंच मनोज अनपट यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कष्ट उपसून बांध-बंधारे बांधले. तसेच आधी बांधलेल्या १४ माती बंधारे, १ पाझर तलाव आणि ५ सिमेंट बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. त्यामुळे पाणी साठवण क्षमता आणि भूजल पातळी वाढण्यास साहाय्य झाले. यातून उपलब्ध झालेल्या १ लाख ३० हजार घनमीटर गाळाचा शेत जमीन सुपीक करण्यासाठी उपयोग झाला. या तसेच जलयुक्त शिवारसारख्या कामांमुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाले.पाणी टंचाई कमी झाल्यामुळे, तसेच ठिबक सिंचनासारखे पर्याय वापरल्यामुळे शेतीतील उत्पन्न वाढले. शेतक-याला चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी पारंपरिक पिकांसोबतच रोजगार हमी योजनेअंतर्गत १४ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून रेशमी उत्पादनाला सुरुवात करण्यात आली. तसेच २५ हेक्टरवर सामूहिक शेतीतून कांदा बीज उत्पादन घेतले जाते. हळद, ऊस आदी पिकेही सेंद्रिय पद्धतीने येथे घेतली जातात. या सर्व प्रयत्नांमुळे एकेकाळी दुष्काळी असणा-या या गावाने कृषी उत्पादनात आघाडी घेतली आहे. पाणी टंचाईवर मात केल्याची दखल घेत गावाला वॉटर कप स्पर्धेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.