मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (डिजिटल) हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या अंदरसूल गावच्या सरपंच विनीता अमोल सोनवणे यांना देण्यात आला.
गट - डिजिटलसरपंचाचे नाव - विनीता अमोल सोनवणेगाव - अंदरसूलतालुका - येवलाजिल्हा - नाशिक
अंदरसूल ग्रामपंचायतीचे डिजिटलायझेन...
ग्रामपंचायतींचा कारभार वेगवान आणि अधिक पारदर्शक होण्यासाठी डिजिटलायझेशन अत्यावश्यक आहे. हे ओळखून आपले गाव कालसुसंगत आणि अद्ययावत ठेवण्यासाठी विनीता सोनवणे यांनी अंदरसूल ग्रामपंचायतीचे डिजिटलायझेन केले. बँक आॅफ बडोदाकडून पॉस यंत्र विकत घेऊन त्यांनी करवसुली कॅशलेस केली. तसेच ग्रामपंचायतीतील अन्य कामेही संगणकीकृत करण्यात आली आहेत.कार्यालयात इंटरनेट आणि वाय फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दाखलेही आॅनलाइन पद्धतीने झटपट उपलब्ध होतात. डिजिटलायझेशनची पावले उचलल्यामुळे गावाची प्रगती आता झपाट्याने होत आहे.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.