साहेबराव नरसाळे/ अरुण वाघमोडे लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : शिर्डी इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश करताच सिमेंटच्या चकचकीत रस्त्यावर कारने ताशी १२० किलोमीटरचा वेग धरला. काही अंतर पार केल्यावर अचानक एक कुत्रा कारसमोर आला अन् समृद्धीच्या प्रवासात पहिला अडथळा आला. पुढे थांबत, लोकांशी संवाद साधत रस्त्याचे निरीक्षण करीत नागपूरच्या दिशेने निघालो. या प्रवासात सकाळी साडेदहा ते सायंकाळी ७ या नऊ तासांच्या प्रवासात वेगाचा थरार पाहायला मिळाला. माणसे कमी अन् कुत्री, साप, वानर अशा प्राण्यांच्या स्पीड ब्रेकरची जणू रांगच लागली. हे अडथळे ओलांडत आम्ही महामार्गालगतच्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही गावांतही डोकावून पाहिले.
सुमारे २० किलोमीटर प्रवास केल्यानंतर संवत्सर (ता. कोपरगाव) गावाच्या हद्दीत एक व्यक्ती महामार्ग ओलांडून त्याच्या घराकडे जाताना दिसला. त्याला थांबवून त्याच्याशी चर्चा केली. त्याच्या गावात जाण्यासाठी महामार्गावरून इंटरचेजची सुविधा नाही. त्यामुळे पुढील पिंपळगावचे इंटरचेंज किंवा मागील शिर्डी इंटरचेंज गाठावे लागते.
रस्ता निर्मनुष्य, क्वचितच एखादे वाहन रस्त्यावर दिसत होते. हे वाहनही वेगाची मर्यादा ओलांडून अगदी १८० च्या वेगाने धावत असावे, असे भुर्रकन निघून जात होते. महामार्गाच्या कडेला हिरवीगार पिके डौलाने शेतात उभी होती. महामार्गावरून एक-दीड किलोमीटरच्या अंतरावर अधूनमधून एखादे गाव झर्रकन नजरेसमाेरून जाई. इच्छा असूनही त्या गावात जाता येत नव्हते. महामार्गाच्या दुतर्फा सिमेंटचे ढापे टाकून उभारलेली भिंत आडवी ठाकलेली. महामार्गावरून खाली उतरण्यासाठी कोठेही मुभा नाही.
पहिला इंटरचेंज औरंगाबाद जिल्ह्यातील हडसपिंपळगाव येथे लागला. दौलताबाद इंटरचेंज येथे आम्ही कार महामार्गावरून खाली उतरविली आणि पहिला टोल लागला. येथे टोल भरून एक वळसा घेऊन आम्ही पुन्हा महामार्गावर जाण्यासाठी निघालो तर दुसरा टोल आडवा आला. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या हद्दीत महामार्गावरील पुलाखाली एका टपरीचालकाशी संवाद साधला. तेथून नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत आम्ही पोहोचलो. कारमधील डिझेलने तळ गाठला होता. त्यामुळे पेट्रोल पंप शोधत आम्ही महामार्गावरून खाली उतरून हिंगणा तालुक्यातील वडगावात दाखल झालो.
टायर फुटला, काय करायचे? रस्त्यात कुठेतरी काम करणारे कर्मचारी, क्वचितच दिसणारे पेट्रोल पंप आणि रस्त्यालगत शेळ्या, जनावरे चारताना दिसणारे शेतकरी इतकाच काय तो वावर या महामार्गावर दिसला. बाकी अनेक किलोमीटरपर्यंत नीरव शांतता होती. गाडीचा टायर फुटला किंवा अचानक काही बिघाड झाला तर सध्या तरी या महामार्गावर कुठे काहीच सुविधा दिसली नाही.
महामार्गावर यायला लागतो एक तासशिर्डी ते नागपूरपर्यंत महामार्गाच्या लगत अनेक गावे आहेत. मात्र तेथे जाण्यासाठी थेट रस्ता नाही. इंटरचेंजच्या माध्यमातून गावांना रस्ता जोडलेला आहे. त्यामुळे महामार्गावरून गाव जवळ दिसत असले तरी तेथे पोहोचायला अर्धा ते एक तास वेळ लागतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर रविवारी रात्री ‘लोकमत’ टीमने नागपूर ते शिर्डी असा नॉनस्टॉप प्रवास केला. त्यानंतर सोमवारी सकाळी १०.३० वाजता शिर्डी ते नागपूर असा प्रवास करीत ‘लोकमत’ने महामार्गावरून गावांमध्ये डोकावण्याचा व श्वास घेण्याची ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न केला.