नागपूर : विधिमंडळात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असा ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ आहे, यासाठी मी लोकमतचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. विधानमंडळात उत्कृष्ट काम करणा-या सदस्यांचा गौरव करण्याचा निर्णय लोकमतने घेतला आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा नागपुरात मोठ्या उत्साह पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्यात मंचावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, प्रसिद्ध विधिज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. या विजेत्यांची कामे मी जवळून पाहिली आहेत. विद्याताई चव्हाण यांनी पोटतिडिकीने सामान्य माणसांचे प्रश्न सभागृहात मांडले आहेत. यशोमतीताईंनीही उत्कृष्ट कामगिरी केली. अनिल सोले प्रथमच विधानपरिषदेत निवडून गेल्यावर त्यांनी उत्तम काम केले. तर, सुनील प्रभू मुंबईचे महापौर राहिले आहेत. विधानसभेचे प्रतोद म्हणून काम करीत आहेत. सरकारची बाजू सांभाळात योग्य प्रकारची भूमिका ठेवत असतात. याचबरोबर, संजय दत्त कुठल्याही प्रश्नावर अभ्यासू मत मांडत असतात. त्यांचा प्रश्न असला की मी उत्तराला येतो असा माझ्यावर आरोप आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मैत्री असणे चुकीचे नाही. पण खाजगीत आम्ही शत्रू नाही. हस्तांदोलन करता येते. एका टेबलवर बसून जेवताही येते. हे राजकारणात महत्वाचे आहे. गेल्या साडेतीन वर्षात विखे पाटील माझ्याकडे कधीही वैयक्तिक कामाकरिता आले नाही किंवा कोणाच्याही वैयक्तिक कामाकरीता आले नाहीत. पक्षाच्या संदर्भातील कामे घेऊन आले. ही लोकशाहीची सुदृढता आहे ती आज संपते आहे, ती संपू नये असे प्रयत्न आपण केले पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सामंजस्य याचा अर्थ फिक्सिंग असा होत नाही. लोकशाहीत सुई पडली तरी आवाज येतो. फिक्सिंग असेल तर ते १०० टक्के समजते. हा अजेंडा ठरवण्याची जबाबदारी मिडियाची आहे. कारण तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आम्हाला सुधरवण्याची जी ताकद राजेंद्रबाबू तुमच्यात आहे, ती दुस-या कुणात नाही. आपण सगळे लोकशाहीचे स्तंभ म्हणून जे काम करतो ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करू. शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. लोकशाहीत निष्पक्ष काम करणा-यांचा आज आपण पुरस्कार करतो आहे. चांगल्याचा पुरस्कार करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व सभासदांना असे वाटेल, की लोकमतचा पुढचा पुरस्कार आम्हाला मिळावा, त्यातून योग्य कामाची एक प्रेरणा त्यांना मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
या सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याचबरोबर, सुनील प्रभू यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार(विधानसभा), अनिल सोले यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानपरिषद), श्रीमती यशोमती ठाकूर यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा), श्रीमती विद्या चव्हाण यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानपरिषद), आशिष शेलार यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा) आणि संजय दत्त यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानपरिषद) म्हणून सन्मान करण्यात आला.