पुणे : स्पर्धा बातम्यांची असावी; मात्र पत्रकारितेत परस्परांमधील व्यक्तिगत संबंध मधुर असावेत, ही ‘लोकमत’ची परंपरा आहे, असे मत ‘लोकमत माध्यम समूहा’चे अध्यक्ष व खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. पत्रकारितेत चांगले काम करणाऱ्या पत्रकारांसाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने ‘लोकमत पत्रकारिता पुरस्कार’ सुरू करावेत, असा प्रस्तावही त्यांनी येथे दिला. खासदार विजय दर्डा यांच्या पुणे दौऱ्यामध्ये त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाला भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर या वेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना दर्डा म्हणाले, ‘‘पुणे श्रमिक पत्रकार संघाचे काम पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. त्यादृष्टीने पत्रकार संघाच्या सहयोगाने ‘लोकमत पत्रकारिता पुरस्कार’ सुरू करावेत. त्यात शोध पत्रकारितेसाठी २१ हजारांचा पुरस्कार द्यावा. तसेच पर्यावरण व नागरी प्रश्नांवर परिणामकारक वृत्तांकनासाठी २१ हजार रुपयांचा पुरस्कार द्यावा व उत्कृष्ट फोटो जर्नालिझमसाठी ११ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात यावा, असा प्रस्ताव देत आहे. तसेच, स्वातंत्रसैनिक आणि ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती किंवा स्मृतीदिनानिमि राष्ट्रस्तरीय वक्याचे व्याख्यान आयोजित करावे. लोकमत ते पुरस्कुत करेल़’ पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दर्डा यांनी घेतली. या वेळी ते म्हणाले, ‘‘पत्रकार संघात येऊन मला मनापासून आनंद झाला. लोकमत हे माझे पहिले घर आहे आणि आज इथे पत्रकारांच्या संस्थेत आल्यानंतर माझ्या दुसऱ्या घरात आल्यासारखे मला वाटले. ज्या ज्या राज्यात मी गेलो तेथील पत्रकार संघात मी जाऊन आलो; परंतु पुण्यातील पत्रकार भवन खूपच वेगळे आहे. पत्रकारांना प्रोत्साहन व सुविधा देण्याचा प्रयत्न इथे दिसून येतो. स्पर्धक वृत्तपत्रे दुसऱ्या वृत्तपत्रांचे नाव छापत नाहीत, हे किती योग्य आहे? भास्कर समूहाचे सुधीर अग्रवाल माझे मित्र आहेत. इतरत्र कुठल्याही कार्यक्रमाला न जाणारे सुधीर अग्रवाल माझ्या एका शब्दासाठी भोपाळच्या लोकमत भवनच्या उद्घाटनासाठी आले. ‘‘स्पर्धा बातम्यांची असावी, गुणवत्तेची असावी, विश्वासार्हतेची असावी; कोतेपणा व संकुचितपणाला थारा नसावा़ परंतु व्यक्तिगत संबंध मधुर असले पाहिजेत ही ‘लोकमत’ची परंपरा आहे.’’ या वेळी पत्रकार श्रमिक अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला़
लोकमत करणार पुण्यातील पत्रकारितेचा गौरव
By admin | Published: November 23, 2015 12:38 AM