पुणे : आजवर स्त्री लढली ती स्वत:च्या अस्तित्वासाठी! वेगाने बदलणा काळाची साक्षीदार असलेल्या स्त्रीचे अस्तित्व हा समाजाचा आरसा आहे. आता वेळ आहे तिने समाजाचे नेतृत्व करण्याची! विविध क्षेत्रांमध्ये आत्मविश्वासाने नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या महिलांचा सन्मान ‘लोकमत वुमन समीट’च्या आठव्या पर्वात केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानाचा हा नेत्रदीपक सोहळा उद्या (मंगळवारी) रंगणार आहे. ‘लीव्ह टू लीड’ या संकल्पनेअंतर्गत आपल्या असीम कर्तृत्वाने जगाला अचंबित करणाऱ्या स्त्रीचे नेतृत्व तिच्याच नजरेतून जाणून घेण्याची संधी लोकमत माध्यम समूहाने उपलब्ध करुन दिली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र महिला आयोग आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील. परिषदेला प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, राजश्री देशपांडे, सौंदर्या शर्मा, जल आणि शाश्वत विकासच्या तज्ज्ञ रुपाली देशमुख, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव विनीता सिंघल, लेक्झिकॉन स्कूल्सच्या संचालिका डॉ. मोनिषा शर्मा, सिम्बायोसिसच्या संचालक स्वाती मुजुमदार, तृतीयपंथीयांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या गौरी सावंत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, ऐश्वर्या तमाईचीकर, उद्योजिका सुजाता चॅटर्जी, श्रद्धा शर्मा, प्रसिद्ध वेडिंग डेकोर डिझायनर गुरलीन पुरी उपस्थित राहणार आहेत. महिलांनी आज समाजाच्या सर्व क्षेत्रांत नेतृत्वाच्या दिशेने झेप घेतली आहे. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. महिलांच्या शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाईंच्या दिशेने दगड फेकले गेले. त्यावरही महिलांनी मात केली. शिक्षणाचे अग्निपंख मिळाल्याने देशातील पहिल्या डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांनी मान मिळविला. संस्कृतमध्ये वादविवाद करून शास्त्रार्थात सनातन्यांचा पराभव करणाऱ्या रमाबाई रानडे यांचे कर्तृत्व अढळ ताऱ्यासारखे चमकू लागले. लक्ष्मीबाई टिळक यांनी महिलांची व्यक्त होण्याची वाट प्रशस्त केली. महिलांच्या इतिहासातील या चारही टप्प्यांनी महिलांना नेतृत्वाकडे झेप (लिव्ह टू लिड) घेणे शक्य झाले. विविध परिसंवादातून हा प्रवास उलगडणार आहे. डीपीईएस व हॉटेल माधव इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी आणि धीरेंद्र आऊटडोअर मीडिया प्रा. लि. आऊडोअर पार्टनर आहेत.
......................
* नियोजित ध्येयपूर्तीकडे जाण्यासाठी आणि या प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज असते. पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणा-या कॉर्पोरेट क्षेत्रात स्त्रीने आपले अस्तित्व आणि नेतृत्व सिध्द केले आहे. महिलांच्या या गगनभरारीची दखल लोकमत वुमेन समिटच्या माध्यमातून घेतली जात आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. प्राचीन काळापासून स्त्रीने वैचारिक क्रांती घडवून आणली आणि आपल्या विचारांतून, कृतीतून समाजपरिवर्तनात मोलाचे योगदान दिले. स्त्रीच्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय समाजाचे चित्र पूर्ण होऊच शकत नाही. समानतेचे सूत्र समाजात रुजत असतानाच ‘स्त्रीने नेतृत्व करण्यासाठी जगावे’ हा संदेश सकारात्मक दिशा देणारा आणि तिचे बळ वाढवणारा आहे. कोणत्- अनुराधा देसाई, चेअरमन, व्हीएच ग्रूप-------------* आपल्या विचारांतून, कृतीतून स्त्रीने समाजासमोर कायम नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रस्थापित मानसिकतेला छेद देत महिला स्वत:चे नवे विश्व निर्माण करु पाहत आहेत. आज अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या हुद्यावर, महत्वाच्या पदांवर तसेच निर्णयप्रक्रियेमध्ये स्त्रियांना महत्वाचा सहभाग आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत असतानाच तिच्या कार्यकर्तृत्वाची दखल लोकमत माध्यम समूहाकडून घेतली जात आहे. महिला सक्षमीकरणाचे धडे शालेय स्तरापासून गिरवल्यास भविष्यातील चित्र अधिक आशादायी असेल.- पंकज शर्मा, संचालक, लेक्सिकन ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटस