ठाणे - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही. उद्धव ठाकरेंना ५ वर्ष मुख्यमंत्रिपदी बसायचं होतं. भाजपाचं संख्याबळ कमी व्हावं यासाठी १२ जणांना निलंबित केले. भाजपाच्या ४-५ नेत्यांना अटक करायचं प्लॅनिंग होते. भाजपाला घाबरवून २५-३० आमदार फोडायचं पूर्ण प्लॅनिंग तयार होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीची बैठक आयोजित केली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वर्धापन दिनावेळी आईचं दूध विकणारी टोळी आणि बरेच काही भाषण केले. मला राज्यसभा, विधान परिषदेच्या प्रक्रियेतून बाहेर काढले. भाजपाच्या लोकांना आत घालून मलाही संपवण्याचं कटकारस्थान होते, एका गुन्ह्यात माझे खोटे नाव गोवण्याचं सुरू होते असंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
तसेच मी कधी कुणाकडे पद मागितले नाही. मला आनंद दिघेंनी पुढे आणले. माझ्या दु:खाच्या प्रसंगात आनंद दिघेंनी साथ दिली. तुला लोकांसाठी, समाजासाठी काम करायचंय ही वाक्य आजही मला आठवतात. मी सभागृह नेतेपदही मागितले नाही. जेव्हा तो प्रसंग झाला, तेव्हा मला दिघेंनी बोलावून घेतले. माझी मानसिकता नाही, परंतु दिघेसाहेबांनी फार आग्रह केला. त्यांचा शब्द मला मोडता येत नव्हता मात्र त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला असंही शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, सिनेमात जे काही दाखवलं, राजन विचारे स्वत:हून आले, त्यांनी पद दिले हे खोटे आहे. दुसऱ्या सिनेमात ते खरे दाखवणार आहे. राजन विचारेंना राजीनामा द्यायला सांगितला परंतु त्यांनी दिला नाही. राजन विचारे रघुनाथ मोरेंकडे गेले. तेव्हा मोरेसाहेब समजूतदार होते. त्यांनी म्हटलं, दिघेंनी जो निर्णय घेतला तो विचार करून आणि विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तु बिल्कुल काही न बोलू नको असं त्यांनी सांगितले. राजन विचारे दिघेसाहेबांना खूप काही बोलले. त्यानंतर आनंदाश्रमात साहेबांनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत समजावलं. राजन विचारे हे दिघेसाहेबांचे नकली शिष्य आहेत. दिघेसाहेबांना ज्याने कायम त्रास दिला, ते आम्हाला माहिती आहे. दिघेंसाहेबांपुढे प्रतिस्पर्धी उभं करण्याचं काम करत होते असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.