आघाडी धर्म पाळा, अजूनही वेळ गेली नाही; ठाकरेंच्या उमेदवार यादीवर काँग्रेस नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 01:00 PM2024-03-27T13:00:46+5:302024-03-27T13:01:19+5:30
Congress vs Uddhav Thackeray: ठाकरेंची उमेदवार यादी जाहीर होताच काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली असून उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
मुंबई - Congress Upset on Uddhav Thackeray ( Marathi News ) महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच यादी जाहीर होईल असं वारंवार संजय राऊतांकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिली यादी जाहीर केली. त्यात सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यावरून आता काँग्रेसनं उघडपणे नाराजी व्यक्त करत अजूनही वेळ गेली नाही असं विधान केले आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांचा बाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे असं माझे मत असून अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
तर महाविकास आघाडीचा जागावाटप चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे हे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाकडून जाहीर झालेले १७ उमेदवार
बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजोग वाघेरे-पाटील
सांगली - चंद्रहार पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक - राजाभाई वाजे
रायगड - अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
ठाणे - राजन विचारे
मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
परभणी - संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई