मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही, काँग्रेसचा पवित्रा; 'या' जागांवर लढण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 04:00 PM2024-03-29T16:00:16+5:302024-03-29T16:00:51+5:30
Loksabha Election 2024: ठाकरे गटाने १७ जणांची उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली
मुंबई - लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागलेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद समोर येत आहेत. महाविकास आघाडीतकाँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाने १७ ठिकाणी उमेदवारांची घोषणा केली. त्यात सांगली, दक्षिण मध्य मुंबई जागेवरही उमेदवार घोषित केलेत. त्यात आता मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही असा पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून मित्रपक्षांसमोर न झुकण्याचा निर्णय नेत्यांचा झाला आहे. सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्ये यासारख्या जागांवर महाविकास आघाडीत वाद आहे. सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. तर भिवंडीची जागा आपल्याला सोडावी असा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे. सांगलीत विशाल पाटील हे इच्छुक आहेत. अलीकडेच सांगलीच्या स्थानिक नेत्यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली.
सांगली, भिवंडीसारख्या अन्य ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय प्रमुख काँग्रेस नेत्यांनी घेतला आहे. त्याला काँग्रेस हायकमांडनेही ग्रीन सिग्नल दिल्याचं समोर आले आहे. मविआच्या जागावाटपावरून बराच गोंधळ पाहायला मिळाला. अनेक मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ असणाऱ्या जागा लढवण्यावर नेते ठाम आहेत. त्याबाबत दिल्लीत हायकमांडशी चर्चा केली. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी या जागांवर दावा सोडलेला नाही. त्यामुळे या जागांवर काँग्रेसचे उमेदवार उतरवण्याची तयारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
ठाकरे गटाने १७ जणांची उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संजय राऊतांनी पलटवार करत आमच्या दृष्टीने जागावाटपावरील चर्चा संपली आहे. आणखी किती चर्चा करायची असा सवाल केला होता. परंतु सांगलीसह इतर जागांवर काँग्रेसचा दावा कायम आहे. महाविकास आघाडीतल्या या जागावाटपामुळे वादामुळे आता काही मतदारसंघात काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करत उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.