मत विभाजनाचं पाप करू नका, काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीला पुन्हा आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:35 PM2024-04-05T21:35:57+5:302024-04-05T21:36:39+5:30

सर्वधर्म समभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपाने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, देशाला कमजोर केले जात आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

Loksabha Election 2024: Don't commit vote division, Congress appeals again to Vanchit Bahujan Aghadi | मत विभाजनाचं पाप करू नका, काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीला पुन्हा आवाहन

मत विभाजनाचं पाप करू नका, काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीला पुन्हा आवाहन

भंडारा - Nana Patole on Prakash Ambedkar ( Marathi News ) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औवेसींच्या एमआयएम व वंचितने मतविभाजन केल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. आजची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. मतविभाजनाचे पाप करु नका, असे आवाहन पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्याप्रकाश आंबेडकर यांना केले.   

भंडारा गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या भंडारा येथील प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की, भाजपा सत्तेत आले तर २४ तासात ओबीसी आरक्षण देतो अशी वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण आरक्षण काही दिले नाही. भटक्या जाती, आदिवासी यांना संपवण्याचे काम भाजपा करत आहे. राहुल गांधी यांनी न्याय यात्रेत जनतेशी संवाद साधला, यातूनच ५ न्याय २५ गॅरंटी बनवल्या आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात महिला, तरुण, शेतकरी, कामगार, व हिस्सेदारी असे ५ न्याय दिले आहेत. काँग्रेसचे ५ न्याय व २५ गॅरंटी हे घरोघरी पोहचवण्याचे काम करा. काँग्रेसच्या गॅरंटीची चायना माल अशी टिंगल भाजपा करत आहेत. कोरोनाचे संकट पाहून तातडीने उपाय करण्याचा सल्ला राहुल गांधी यांनी दिला होता त्याचीही भाजपाने अशीच टिंगळटवाळी केली होती, आताही तेच सुरु आहे अशी टीका त्यांनी केली. 

तर भाजपाने केवळ हिंदू-मुस्लीम समाजात भांडणे लावून शांतता बिघडवण्याचे काम केले तर राहुल गांधी यांनी समाजात एकोपा रहावा यासाठी भारत जोडो यात्रा काढली. सर्वधर्म समभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपाने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, देशाला कमजोर केले जात आहे. मोदी सरकार पुन्हा आले तर निवडणुकाही होणार नाहीत, हा धोका टाळण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले. त्याचसोबत देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते पण त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, केंद्र सरकार नोकर भरती करत नाही, कंत्राटी पद्धतीने पदे भरत आहेत तर दुसरीकडे लाखो तरुण नोकरीपासून वंचित आहेत. महागाई कमी केली नाही, १५ लाख रुपये खात्यात जमा करणार अशा गॅरंटी दिल्या पण या सर्व मोदी गॅरंटी खोट्या निघाल्या असा आरोप त्यांनी केला. 

भाजपाचं सरकार आल्यास लोकशाहीचा अस्त होईल

दरम्यान, भाजपा हा काँग्रेस पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. इन्कम टॅक्सच्या नोटीस पाठवल्या जात आहेत, त्याच नियमाप्रमाणे भाजपाला नोटीस पाठवली तर ५ हजार कोटी रुपये वसुल करावे लागतील. काँग्रेस पक्ष हा महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे, ते भाजपाला चालत नाही, राज्यघटना बदलण्याचा त्यांचा डाव आहे. नरेंद्र मोदींनी जनतेला खूप आश्वासने दिली पण शेवटी काय झाले, ज्याला नेता समजले तो अभिनेता निघाला. भारतीय राजकारणावर मोठं संकट आले आहे, भाजपाचे पुन्हा सरकार आले तर लोकशाहीचा अस्त होईल व तानाशाही सुरु होईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना संपुष्टात येईल असं खासदार मुकुल वासनिक म्हणाले. 

Web Title: Loksabha Election 2024: Don't commit vote division, Congress appeals again to Vanchit Bahujan Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.