लोक भूमिका कशी बदलतात कळत नाही?; रोहित पवारांचा अजित पवार-राज ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 03:19 PM2024-03-29T15:19:57+5:302024-03-29T15:35:53+5:30
Loksabha Election 2024: बारामती लोकसभा निवडणुकीतील सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवारांनी भोर तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यात त्यांनी विरोधकांसह अजित पवार, राज ठाकरेंवरही निशाणा साधला.
पुणे - Rohit Pawar Statement ( Marathi News ) येणाऱ्या काळात चिन्हही गेले, पक्षही गेला मग लढा कमळबाईसोबत अशी परिस्थिती येणार आहे. कमळाबाईबद्दल पूर्वी कोण कोण बोलायचं, लय भारी भाषणं होतं, भारी वाटायचं आपल्याला, मग लोक एवढ्या लगेच भूमिका कशी बदलतात अशा शब्दात आमदार रोहित पवारांनीअजित पवार आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भोरच्या संवाद मेळाव्यात रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. रोहित पवार म्हणाले की, पूर्वी वेगळे बोलायचे आणि आज काही वेगळे बोलतायेत. पुढे भाषण ऐकणाऱ्यांनाही कळत नसेल, पूर्वी काय आणि आता काय? मोठ्या सभेत लाव रे तो व्हिडिओ लावायची वेळ येणार आहे. पूर्वी मोदींविरोधात बोलायचे आणि पवारांविरोधात बोलतात. एवढी भूमिका बदलत असेल तर जग खूप वेगात बदलतंय असा टोला त्यांनी लगावला.
तसेच आम्ही ५ वर्ष सत्ता बघितली, आम्ही विरोधातही बसून पाहिले, पक्ष फुटताना पाहिला, कुटुंबही फुटताना पाहिले. कोरोनासारखा काळ पाहिला. अजून ७-८ महिने लागलेत. राज्यात आपले खासदार निवडून येतील. पण २०२४ च्या राज्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी जनता भाजपाला बाहेर ठेवणार आणि महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी २०१९ साली मांडलेली आपण भूमिका पाहिली. भाजपाकडून मराठी अस्मितेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उद्योग गुजरातला जात आहेत. असे असताना ते भाजपासोबत जाण्याची भूमिका घेत असतील तर त्यांची आधीची भूमिका चुकीची असावी किंवा आताचा भूमिका त्यांच्या सोयीची असावी असा टोलाही रोहित पवारांनी राज ठाकरेंना लगावला.