४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 02:08 PM2024-05-08T14:08:40+5:302024-05-08T14:09:24+5:30
loksabha Election - येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील, काहीजण विलीनीकरण करतील असं विधान शरद पवारांनी केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पुणे - Prithviraj Chavan on Sharad Pawar ( Marathi News ) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यावर आत्ताच काही सांगता येणार नाही. जे काही होईल ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल असं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मांडले आहे.
प्रादेशिक पक्षांबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवारांनी ही मुलाखत सातारला दिली, सातारच्या सांगता सभेनंतर दिलेल्या या मुलाखतीत मीदेखील तिथे होतो. शरद पवारांनी मांडलेले मत हे त्यांचे व्यक्तिगत आहे. त्यांनी २ गोष्टी मांडल्या, त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारधारेत फरक नाही. सहकाऱ्यांना विचारून निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं. काँग्रेसमध्ये विलीन होईल का यावर त्यांनी नकार दिलेला नाही. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील, काही विलीन होतील असंही ते बोलले. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ते अवलंबून असेल असं मला वाटते. जर इंडिया आघाडीची सत्ता आली तर शरद पवार म्हणतायेत तसं होईल. सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी काँग्रेससोबत अनेकजण येतील. पण विरोधात निकाल लागला तर मग तसे होणार नाही, भाजपासोबत जाण्याची प्रवृत्ती दिसेल वाटते असं त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवारांच्या पक्षाचं विलीनीकरण हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर मला सांगता येत नाही. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जे काही असेल ते स्पष्ट होईल. ही निवडणूक बहुतांश १९७७ सारखी आहे. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना पराभूत करण्यासाठी अनेक लहान मोठे पक्ष एकत्र आले होते. आजही तीच परिस्थिती आहे. तेव्हाही पंतप्रधानपदाचा चेहरा पुढे आणला नव्हता. इंडिया आघाडीचं सरकार आले तर खासदार बसून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण हे ठरवतील असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं बहुमत येईल. महायुतीपेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. निश्चित किती जागा येतील ते पाचही टप्पे झाल्यावर सांगता येईल. नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत विरोधात सुप्त लाट आहे. मोदींनी अर्थव्यवस्था योग्य प्रमाणे न हाताळल्याने महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांमध्येही नाराजी आहे. निवडणूक रोखेचा भ्रष्टाचार उघड झाला. साम, दाम दंड भेद वापरून निवडून आलेली सरकारे पाडली. पैशाचा घोडेबाजार झाला, त्यावर लोक नाराज आहेत. त्यामुळे आमदार, नेते तिथे गेले असले तरी जनता त्यांच्यासोबत गेलीय का हे ४ जूनला आपल्याला कळेल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेच्या काँग्रेस प्रवेशावर म्हणाले...
२०१३ साली एकनाथ शिंदे ४-५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा राजन विचारेंनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत मला काही माहिती नाही. २०१४ च्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असावी. परंतु माझ्यापर्यंत हा विषय कधी आला नाही असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केले.