मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमहायुतीत येणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीतील अमित शाह भेटीनंतर या चर्चांना जोर आला. त्यानंतर मुंबईत राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचीही भेट झाली. त्यामुळे मनसे महायुतीत येणार हे जवळपास निश्चित मानलं गेले. परंतु आता मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत नवीन माहिती समोर येत आहे.
मनसेनं महायुतीत यावं यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या. परंतु मनसेनं महायुतीतील एका चिन्हावर लढावं असा प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळला. त्यानंतर मनसेनं लोकसभा निवडणूक न लढता महायुतीला पाठिंबा द्यावा. त्या बदल्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा घ्याव्यात असं पुढे आले. मात्र राज ठाकरेंनी या प्रस्तावालाही नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. मनसेसोबत चर्चा सुरू होत्या परंतु वाटाघाटी होत नसल्यानं सध्या तरी कुठलाही निर्णय नाही अशी स्थिती आली आहे.
मनसेनं भाजपा किंवा शिवसेनेच्या चिन्हावर लढावं असा प्रस्ताव होता. त्याला मनसेनं नकार दिला. मनसे स्वत:च्या रेल्वे इंजिन या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे. राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीसांमध्ये भेटी झाल्या. त्यानंतर राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत मनसेला त्यांच्या चिन्हावर लढण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. मनसेनं ३ जागांची मागणी केली. चर्चेत २ जागांवर बोलणी झाली. त्यातील एका जागेवर दोन्ही पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र मनसेनं आपल्याच चिन्हावर लढावं अशी अट पुन्हा पुढे करण्यात आली. त्यामुळे मनसेसोबतच्या चर्चा थंडावल्या आहेत. ही बातमी ABP नं सूत्रांच्या हवाल्यानं दिली.
दरम्यान, मुंबईतील दक्षिण मुंबई ही जागा मनसेला महायुतीत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. याठिकाणी सध्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच महाविकास आघाडीने रिंगणात उतरवलं आहे. तर या मतदारसंघात मनसेची ताकद पाहता ही जागा मनसेला देण्यासाठी महायुती सकारात्मक आहे. पण मनसेनं कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर लढावं अशी अट आहे. परंतु मनसेचा त्यासाठी नकार असल्याचं बोललं जाते. त्यामुळे आगामी काळात मनसे युतीवर काय तोडगा निघतो हे पाहणे गरजेचे आहे.