पुणे - Vijay Shivtare on Mahadev Jankar ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महादेव जानकर यांनी अचानकपणे महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जानकरांना लोकसभेची १ जागा दिली जाणार ती कोणती अशी चर्चा सुरू असतानाच अचानक बारामती लोकसभेतून महादेव जानकर उभे राहणार असं बोललं जात आहे. लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. जानकर २०१४ सालीही लढले होते. एकाबाजूला सुनेत्रा पवारांचा प्रचार चालू होता मग अचानक महादेव जानकरांचे नाव अचानक कसं आलं याचे आश्चर्य वाटतं असं विधान विजय शिवतारे यांनी केले आहे.
विजय शिवतारे म्हणाले की, मी जनतेच्या जीवावर आणि विश्वासावर प्रतिनिधी म्हणून उभा राहणार आहे. बारामतीत कुणालाही उभे केले तरी मी लढणार, महादेव जानकर असो वा कुणीही. जनता पाठिशी असल्यावर घाबरण्याचे कारण काय? पवारांविरोधात जे लोक आहेत त्यांना मतदान करण्याची संधी माझ्या निमित्ताने होणार आहे. ५० वर्ष पवार घराण्यालाच मतदान करावे का? सुप्रिया सुळे निव्वळ सेल्फी काढत फिरतात, फंडाने काही काम करत नाही असा आरोप त्यांनी केला. तसेच मतदारसंघातील कोणत्या कामासाठी सुप्रिया सुळे लढल्या आहेत, पाठपुरावा केला आहे? असा सवाल शिवतारेंनी विचारला.
विजय शिवतारें यांची १ एप्रिलला जाहीर सभा
शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी अजित पवार गटातील लोकांकडून होत आहे. पालखीतळ मैदान सासवड या ठिकाणी १ एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. . मी विरोधक आहे, ते मागणी तर करणारंच, असं विजय शिवतारें यांनी सांगितले.
दरम्यान, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत बघायला मिळेल असे चित्र असतानाच आता नवा ट्विस्ट येऊ घातला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया यांच्या विरोधात महादेव जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीची निवडणूक रासपाचे उमेदवार म्हणून लढवली होती. जानकर ७० हजार मतांनी पराभूत झाले होते. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असून त्यांनी आधीच बारामती मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. मात्र आता जानकर यांच्या एन्ट्रीमुळे वेगळे काही होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.