पुणे - Vasant More Reaction ( Marathi News ) मी पण १५ वर्ष पुण्याचा नगरसेवक, निवडणूक अवघड नाही. हा संघर्ष नवीन नाही. पुण्याचा पुढचा खासदार वसंत मोरेच असणार अशा शब्दात वसंत मोरे यांनी भावना व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेतून राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी मविआच्या विविध नेत्यांची भेट घेतली. परंतु मविआनं काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज वसंत मोरे यांनी नुकतेच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.
वंचितकडून उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे म्हणाले की, मी मनापासून प्रकाश आंबेडकर यांचा आभारी आहे. पुणे लोकसभेसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याचा फोन आला होता. पुण्यात पहिल्यापासून तिरंगी लढत होईल हे सुरू होते. माझ्या विजयाची १०० टक्के खात्री आहे. कुठलेही आव्हान अवघड नाही. आतापर्यंत कायम संघर्ष करत आलोय. हा संघर्ष नवीन नाही. पुण्याचा खासदार हा वसंत मोरेच असेल असं त्यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ, मविआकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वसंत मोरे यांनी कुठल्याही परिस्थिती लोकसभा निवडणूक लढणारच असा चंग बांधला होता. त्यानुसार वसंत मोरे यांनी मनसेतून राजीनामा देत बाहेर पडले.
वसंत मोरे यांनी मविआच्या ३ पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांना वसंत मोरे भेटले होते. परंतु महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने शरद पवार आणि ठाकरे गटाकडून वसंत मोरे यांना काँग्रेसशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र काँग्रेसमध्ये आधीच इच्छुक असल्याने वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली.