राज ठाकरे महायुतीत आल्यास...; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं 'मनसे' स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 01:47 PM2024-03-21T13:47:05+5:302024-03-21T13:48:03+5:30
राज ठाकरे महायुतीत सहभागी होतील अशी दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे. कारण नुकतेच राज यांनी दिल्लीला जात अमित शाह यांची भेट घेतली होती.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर या चर्चांना बळ आले. राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर निश्चित फायदा होईल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पत्रकारांनी मनसेच्या महायुतीतील सहभागावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे महायुतीत येणार अशी चर्चा सुरू आहे. अंतिम काय चर्चा झाली हे माहिती नाही. आणखी एक बैठक होणार आहे असं माध्यमांमधून कळतंय. शेवटी कुठल्याही युतीत जर कुणी आले तर बेरीजच होत असते. त्याचा फायदाच होत असतो. त्यामुळे राज ठाकरे येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे असं त्यांनी सांगितले.
लोकशाहीत प्रत्येकाला टीकेचा अधिकार
लोकशाहीत कुणाला निवडणूक लढवायची हे प्रत्येकाला अधिकार आहे. आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यामुळे त्या नेत्याचे ऐकायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असता तेव्हा प्रत्येकाने तुमचा उदोउदो केला पाहिजे असं काही कारण नाही. त्यामुळे शिवतारेंच्या मनात आले ते बोलले असं प्रत्युत्तर अजित पवारांनी विजय शिवतारे यांच्या टीकेवर दिले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाच्या जाहिरातीत हे न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याची सूचना केली. त्यावर सुप्रीम कोर्ट आपल्या देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. त्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करणं हे घटनेने आपल्याला सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूचनेचे पालन करण्यात येईल. लोकसभा निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढवा असंही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे असं अजितदादांनी सांगितले. दरम्यान, महायुतीची आज बैठक होणार होती. त्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा होईल. पुढील २ दिवसात बैठकीची तारीख ठरवू असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, बारामतीत पार्थ पवार प्रचारात दिसत नाहीत असं पत्रकारांनी विचारलं असता, पार्थ पवार गुप्तपणे प्रचार करतायेत. गनिमी काव्याने प्रचार करतायेत अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी माध्यमांसमोर केली.