नवी दिल्ली - Lok sabha first phase voting ( Marathi News ) लोकसभा निवडणूक २०२४ साठी देशात सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी होईल. अधिसूचना जारी होताच उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात करू शकतात. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला २१ राज्यातील १०२ जागांवर मतदान होईल. या पहिल्या टप्प्यात १० राज्यांचा समावेश आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मार्च असेल.
पहिल्या टप्प्यात जे उमेदवार अर्ज भरतील त्यांना उमेदवारी मागे घेण्याची मुदत ३० मार्च असेल. बिहारमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ मार्च तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २ एप्रिल असणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या ५ जागांवर मतदान होणार आहे.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार असली तरी अद्याप यांच्यातील जागावाटप निश्चित झालं नाही. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश असेल की नाही याबाबतही साशंकता आहे. कारण जागावाटपावर महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याचं दिसून येत आहे. तर महायुतीतही जागावाटपावरून कुणाला किती जागा मिळणार हे निश्चित नाही.
दरम्यान, भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील नागपूरहून नितीन गडकरी, चंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले आहे. परंतु रामटेक, गडचिरोली-चिमूर, भंडारा गोंदिया याठिकाणचे उमेदवार अद्याप ठरले नाहीत. रामटेकच्या जागेवर सध्या शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने खासदार आहेत. त्याठिकाणी उमेदवार बदलणार अशी चर्चा आहे. तर भंडारा गोंदिया हा मतदारसंघ महायुतीत भाजपा किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार हे स्पष्ट नाही. गडचिरोलीच्या जागेवर अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील या जागांवर अद्याप महायुतीत अद्यापही चर्चा सुरू असल्याचं बोललं जाते.