मुंबई - लोकसभा निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात अशात अद्यापही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मविआत कोण किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे मविआतील जागावाटपावरून वाद पाहता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नवी ऑफर दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलंय की, आगामी लोकसभा निवडणूक या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. महाविकास आघाडीने आपापसात जागावाटपाचे समीकरण निश्चित केलेले नाही. मी आघाडीबाबत सकारात्मक आहे परंतु जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेना यांच्यात किमान १० जागा आणि काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीत ५ जागांवर समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी वेळ लागतो असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणुकीसाठी कमी कालावधी, काँग्रेस-शिवसेना यांच्यातील असमन्वय आणि महाविकास आघाडीत जागावाटप फॉर्म्युला अंतिम न होणे हे लक्षात घेता मी ९ मार्च रोजी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली तेव्हा शिवसेना कमीत कमी १८ जागा ज्या भाजपासोबत एकत्रित असताना त्यांनी जिंकल्या होत्या, त्या मागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. चेन्नीथला यांची चिंता समजून मी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्रित बसून ज्या जागा काँग्रेसच्या मनात आणि महाविकास आघाडीत मागणी केल्यात त्या सर्व जागांवर चर्चा करावी असा प्रस्ताव दिला. तेव्हा बाळासाहेब थोरात माझ्याशी संपर्क साधून प्रस्तावावर पुढे चर्चा करतील असं आश्वासन मला देण्यात आले असं प्रकाश आंबेडकरांनी पत्रात म्हटलं.
त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही. लवकरच वरील प्रस्तावावर बाळासाहेब थोरात चर्चेसाठी तारीख आणि वेळ ठरवतील ही मला आशा आहे. जेणेकरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून भाजपा-आरएसएसला उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे जाऊ असंही प्रकाश आंबेडकरांनी पत्रात सांगितले आहे.