सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा; रिक्त जागेवर मिळणार संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 09:12 AM2024-04-23T09:12:45+5:302024-04-23T09:13:24+5:30
पीयूष गोयल जिंकले, तरच मिळू शकेल राज्यसभेची जागा, सातारा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने महायुतीत त्यावर अजित पवार गटाने हक्क सांगितला होता.
मुंबई : लोकसभेची सातारची हक्काची जागा उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीसाठी भाजपला सोडल्यानंतर अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यसभेची जागा मिळणार आहे. तसे आश्वासन भाजपने दिल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली.
अजित पवार गटाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. गोयल भाजपकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गोयल जून २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आहेत. जर गोयल विजयी झाले तर ते राज्यसभेचा राजीनामा देतील आणि त्यांच्या राज्यसभा खासदारकीची शिल्लक असलेली चार वर्षे अजित पवार गटाच्या उमेदवाराला मिळतील; पण गोयल यांचा पराभव झाला तर अजित पवार गटाला राज्यसभा कशी मिळणार, याबाबत स्पष्टता नाही.
‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ : अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित
‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर तयार करण्यात आलेल्या अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यात केंद्र सरकारने सुरू केलेल्या आणि भाजपने आश्वासन दिलेल्या अनेक योजनांना पाठिंबा देण्याचे व त्यात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. देशात जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी आग्रह धरणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न सन्मानाने गौरवण्यात यावे यासाठी पक्ष मोलाची भूमिका बजावेल, असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
ग्रामविकासाची मांडली पंचसूत्री
सामाजिक न्यायअंतर्गत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आग्रह धरणार असल्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात आहे. शेतकऱ्यांना हमीभाव, उद्योगांना प्राधान्य, कृषी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत वाढ, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा, याचाही उल्लेख जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. गरीब, आदिवासी, दलित, ओबीसींसाठीही या जाहीरनाम्यात आश्वासने देण्यात आली आहेत. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्रीचा उल्लेखही जाहीरनाम्यात आहे.
राज्यातील सर्व समाजघटकांना, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, देशाच्या, राज्याच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे. महायुतीसोबत असलो, तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही.
- अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, अजित पवार गट
साताऱ्याचाच आग्रह कशामुळे?
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार निवडून येत आहे. सध्या इथे राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत. मात्र, ते शरद पवार गटाबरोबर आहेत. असे असले तरी सातारा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने महायुतीत त्यावर अजित पवार गटाने हक्क सांगितला होता. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीत जात अमित शाह यांची भेटही घेतली होती.