रामटेकमध्ये काँग्रेसविरोधात ठाकरे गटाची बंडखोरी; सुरेश साखरे यांनी भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 03:49 PM2024-03-27T15:49:09+5:302024-03-27T15:50:12+5:30
Ramtek Constituency Uddhav Thackeray vs Congress: रामटेक मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने बंडखोरी करत मविआकडून काँग्रेस उमेदवार असलेल्या रश्मी बर्वे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक अर्ज भरला आहे.
रामटेक - Suresh Sakhre Rebellion in Ramtek ( Marathi News ) देशात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील जागांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवट दिवस आहे. राज्यात पूर्व विदर्भातील अनेक जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले. रामटेकची जागा शिवसेना उबाठा गटाने काँग्रेसला सोडली. परंतु तिथे उबाठा गटाच्या सुरेश साखरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
रामटेकमधून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देत ठाकरे गटाच्या सुरेश साखरे यांनी या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. सुरेश साखरे हे ठाकरे गटाचे विदर्भ संघटक म्हणून काम करत होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर साखरे म्हणाले की, हक्कासाठी अर्ज भरला म्हणून कुणी बंडखोरी म्हणत असेल तर ती मान्य आहे. आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्हाला वरून कुणी आदेश दिले नाहीत. वरिष्ठांनी संपर्क साधला नाही. त्यामुळे शिवसैनिकांच्या आग्रहाखातर ही उमेदवारी अर्ज दाखल केला असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत अर्ज मागे घेणार नाही असं साखरेंनी स्पष्ट केले.
तर माझी जनता माझ्या पाठिशी आहे. गोरगरिब जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कुणी हरवू शकत नाही. आज महाविकास आघाडीने मला तिकीट दिली असून जनतेच्या जोरावर मी संसदेत जाणार आहे. मविआचे सर्व नेते माझ्या पाठिशी ताकदीने उभे आहेत. तळागाळात काम करणारा उमेदवार दिला असून त्या उमेदवाराच्या पाठिशी मविआ नेते आहेत असं ठाकरे गटाच्या बंडखोरीवर रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांनी भाष्य केले.
काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद
महाविकास आघाडीत ठाकरे आणि काँग्रेस गटात सध्या टोकाचे वाद दिसून येत आहे. ठाकरेंनी १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात सांगलीतून चंद्रहार पाटील आणि दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यावरून काँग्रेस नेते नाराज झाले. या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीत चर्चा होत असताना उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. त्याबाबत उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा, आघाडी धर्म पाळावा अशी आग्रही मागणी काँग्रेसनं केली. तर आता चर्चा आमच्या दृष्टीने थांबली आहे. आणखी किती चर्चा करायची असा प्रतिसवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. त्यामुळे जागावाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.