पक्ष नेत्यांवरील टीका भोवली; संजय निरुपमांची काँग्रेसमधून ६ वर्षासाठी हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 11:00 PM2024-04-03T23:00:57+5:302024-04-03T23:02:49+5:30
संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढवण्यात इच्छुक होते. मात्र तिथे ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज निरुपमांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वावर टीका करून पक्षाची शिस्तभंग केल्याबद्दल संजय निरुपम यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसनं पाठवलेल्या प्रस्तावावर तातडीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मंजुरी दिली. त्यानंतर पक्षाकडून पत्रक काढून संजय निरुपम यांची हकालपट्टी केल्याचं जाहीर केले.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव के. सी वेणुगोपाल यांच्या सहीचं पत्रक माध्यमांना देण्यात आले आहे. त्यात पक्षाची शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षांनी संजय निरुपम यांना तातडीनं ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याला मान्यता दिल्याचं म्हटलं आहे. आजच दुपारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निरुपम यांच्यावरील कारवाईचे संकेत दिले होते. संजय निरुपम यांचं स्टार कॅम्पेनरच्या यादीतून नाव हटवलं होते. त्यासोबत त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं होते.
काय आहे वाद?
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी संजय निरुपम प्रयत्नशील होते. ही जागा महाविकास आघाडीत आपल्याकडे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र या जागेवर ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यानंतर निरुपम यांनी अमोल किर्तीकरांवर खिचडी चोरीचे आरोप केले. काँग्रेस ठाकरे गटापुढे नरमली आहे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असं संजय निरुपम बोलले. त्यातून हा वाद निर्माण झाला होता.
संजय निरुपम काय म्हणाले होते?
एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. ज्याप्रमाणे यूपीमध्ये काँग्रेस संपली, तसं मुंबईत काँग्रेस संपेल. आमचे नेते थकले आहेत. पुन्हा कसं उभं राहायचं हा त्यांना प्रश्न आहे. गेल्या ४-५ वर्षात एकाही मुद्द्यांवर काँग्रेस रस्त्यावर उतरली नाही. फक्त ट्विटरवर आंदोलन सुरू आहे. मुद्दे हातात घेत नाहीत. तुम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी काम केले पाहिजे पण करत नाही. राज्यात आणि केंद्रात असे नेतृत्व आहे त्यामुळे काँग्रेसची अधोगती सुरू आहे. पुढची रणनीती काय असेल हे मी योग्य वेळी सांगेन असं निरुपम यांनी सांगितले होते.