निवडणुकीचा दुसरा टप्पा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नेत्यांच्या तोफा धडाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 07:06 AM2024-04-24T07:06:28+5:302024-04-24T07:08:17+5:30
राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत २६ एप्रिलला मतदान होत आहे.
मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांसह देशातील ८९ जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यासाठी सध्या जोरजोराने धडाडणाऱ्याा प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत. शेवटच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांचा भर असणार आहे.
राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत २६ एप्रिलला मतदान होत आहे. त्यानिमित्त शेवटच्या दिवशी राज्यात अनेक नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांची अमरावतीत, तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची परतवाडा व सोलापूरमध्ये सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांच्या सभा होतील.
तिसऱ्या टप्प्यात १,३५१ उमेदवार
७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात ९५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी १,३५१ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. तिसऱ्या टप्प्यातील बैतुलसह ९५ जागांसाठी २९६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर १५६३ अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महाराष्ट्रात ११ जागांसाठी २५८ उमेदवार रिंगणात आहेत.