मुंबई - Prakash Ambedkar Statement ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यात महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्टकल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. परंतु येत्या ४-५ दिवसांत महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात होईल असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
पुण्यातील वसंत मोरे यांनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या भेटीनंतर या दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तात्यांसोबत चर्चा झालीय, दुसरी महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. जे काही अधिकृतपणे असेल ते ३१ तारखेनंतर सांगू. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात, ते कोण कोण करणार आहे त्यासाठी अधिकृतपणे ३१ किंवा १ तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल. सगळ्यांसमोर मांडले जाईल. काही चर्चा उघड करू शकत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच अजून बऱ्याच घटना अजून घडतायेत. सामाजिक पातळीवर अनेक चर्चा आहेत. २-३ दिवसांत महाराष्ट्रात काय काय समीकरणे आहेत. ते आपल्यासमोर येईल. आजची चर्चा त्याचाच एक भाग आहे. ग्रामीण आणि शहरी पातळीवर काय घडतंय त्यावर आज बोलत नाही. वसंत मोरेंसोबत चर्चा झाली. त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. ४-५ दिवसांत काय असेल ते समोर येईल असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
दरम्यान, मी पुणे लोकसभेची निवडणूक १०० टक्के लढणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. सकारात्मक चर्चा झाली. येणाऱ्या २-३ दिवसांत पुढचा मार्ग कसा असेल ते स्पष्ट होईल. पुणे लोकसभेचा खासदार या विचारातूनच होईल याची खात्री आहे असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला.