इंदापूर - Supriya Sule on Ajit Pawar ( Marathi News ) हर्षवर्धन पाटील यांना कुणी शिव्या घातल्या तर मी ढाल बनून उभी राहीन. जर पुन्हा असं केले तर गाठ माझ्याशी आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर इथं सुप्रिया सुळेंनी सभा घेतली. त्या सभेतून त्यांनी अजित पवार गटावर जोरदार घणाघात केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुणीही शिवीगाळ करायची नाही. सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. जसा चढ असतो तसा उतारही असतो. माझ्या समोर बसलेली जनता उतरवेल, मला काहीही करायची गरज नाही. दमदाटी बंद करायची आहे. कुणीही आजनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुणीही आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर त्यांना सांगायचं आधी सुप्रिया सुळेंना धमकी दे, मग माझ्याशी बोल असंही त्यांनी बजावलं.
तसेच भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष एकमेकांवर असे हल्ले करतात, हर्षवर्धन पाटलांना शिव्या घातल्यात, ही इंदापूर आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे?, एका मित्रपक्षाचा नेता दुसऱ्या मित्रपक्षाच्या नेत्याला शिवीगाळ करतो. हर्षवर्धन पाटील यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगावे लागले असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीला लगावला.
काय घडलं होतं?
खालच्या पातळीवरील एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आपणास तालुक्यात फिरु देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या मित्र पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच आळा घालावा. ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी नुकतेच भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा. ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात शेवटी हर्षवर्धन पाटील यांनी केली होती.