मुंबई : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे अधिकृत चिन्ह दिले. मात्र, इतर पक्षाच्या काही उमेदवारांना दिलेले ट्रम्पेट चिन्ह आणि ‘तुतारी’त साधर्म्य असल्याने बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला. आक्षेप घेण्याची वेळ निघून गेल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रम्पेट या वाद्याचे ‘तुतारी’ असे भाषांतर आयोगाच्या पुस्तकात असल्याने मतदारांत गोंधळ निर्माण झाल्याचे सुळे यांनी आक्षेपात म्हटले होते. ट्रम्पेट हे मुक्त-चिन्ह असून त्याचे वाटप अगोदरच झाले आहे, त्यामुळे आता यावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली आहे. तसेच मतदान करताना ट्रम्पेट आणि तुतारी ही चिन्हे दिसतात, त्यांची नावे नाहीत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होण्याचा प्रश्न नाही, दोन्ही चिन्हांची तुलना होऊ शकत नाही,” असेही चोकलिंगम यांनी स्पष्ट केले.