चर्चेला मर्यादा असतात, किती चर्चा करायची?; नाराज काँग्रेसला संजय राऊतांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 02:06 PM2024-03-27T14:06:20+5:302024-03-27T14:08:53+5:30

Uddhav Thackeray vs Congress : उमेदवार यादीवरून आता महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहे. ठाकरेंच्या उमेदवार यादीवर काँग्रेसने आक्षेप घेत निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. त्यानंतर राऊतांनीही काँग्रेस नेत्यांना फटकारलं आहे. 

Loksabha election 2024: There are limits to discussion, how much to discuss?; Sanjay Raut target Congress | चर्चेला मर्यादा असतात, किती चर्चा करायची?; नाराज काँग्रेसला संजय राऊतांनी फटकारलं

चर्चेला मर्यादा असतात, किती चर्चा करायची?; नाराज काँग्रेसला संजय राऊतांनी फटकारलं

मुंबई - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) चर्चेला मर्यादा असतात. ती चर्चा आमच्या दृष्टीने थांबलेली आहे असं आम्हाला वाटते. काँग्रेसने उमेदवार जाहीर केले त्यात रामटेकसुद्धा आहे. मग आम्ही आक्षेप घेतला का? पंतप्रधान कोणाला व्हायचं तर काँग्रेसचा होणार आहे. आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जागा कुठे मागतो तर प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यात जागा मागतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ तिथे काँग्रेससमोर कुणीच नाही. तिथे जागा मागतोय का? महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते आहेत. त्यांचे स्वत:चे स्थान आहे. प्रादेशिक पक्ष राहिले, टिकले तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार आहे अशा शब्दात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना फटकारलं. 

संजय राऊत म्हणाले की, जागावाटपावर गेल्या दोन अडीच महिन्यापासून चर्चा करतोय. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचेही काही मतदारसंघ आहे. फक्त आम्हाला अस्तित्व हवं म्हणून कुठे जागा मागावी हे आघाडीत योग्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मागच्या लोकसभेत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती. राज्यात काँग्रेस केवळ एका जागेवर निवडून आली होती. एका जागेवरून १६ जागांवर काँग्रेस लढतेय. तिथे १० जागांवर जिंकणार आहे मग काँग्रेस शरण गेली असं कसं म्हणू शकतो? पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही. रामटेकची जागा जिथे २५ वर्ष शिवसेना जिंकते. मग तिथे आम्ही शरण गेलो असं म्हणू का? असा सवाल त्यांनी केला. 

तसेच आम्हाला एकत्र काम करायचे आहे. कोल्हापूर आमच्या हक्काची जागा आहे. ३० वर्ष आम्ही तिथे लढतोय आणि जिंकतोय. आता तिथे शाहू महाराज लढतायेत मग ते ज्या पक्षाचे चिन्ह घेतील त्यांना ती जागा सोडू. मग आम्ही मविआमध्ये काँग्रेसला ती जागा सोडली. मग आम्ही जाऊन सोनिया गांधींकडे तक्रार करायची का? हातकणंगले जागेवर राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. ती जागादेखील आमची जातेय. मग पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला एक जागा आम्ही घेत असू तर महाविकास आघाडीने त्याचा स्वीकार केला पाहिजे. दिल्लीतील वरिष्ठ नेते समजून घेतील. उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न नाही असं ठामपणे राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. आता काँग्रेसला वाटत असेल ४८ जागांवर लढू तर त्या भावना असतात. आमचीही ४८ जागांची तयारी आहे. परंतु आघाडी केल्यावर आशा-निराशेचा खेळ होतो.  आम्ही वंचितला जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू राहिली असती तर ६ जागाही दिल्या असत्या. आमचे मन साफ होतो. राजकीय व्यवहार पारदर्शक होता. वंचित, शोषित जनता या लढाईत आमच्यासोबत राहावी ही आमची भूमिका होती. शेवटी डॉ. आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे. त्यामुळे जर अप्रत्यक्ष कुणी भाजपाला मदत होईल अशी भूमिका घेत असेल तर राज्यातील जनता त्यांना स्थान देणार नाही असं राऊतांनी वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयावर म्हटलं. 

देशात काँग्रेसचा पंतप्रधान करणं हे आमचं धोरण  

जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. आकडे वाढवण्यासाठी कुणी जागा लढवत नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातले आणि देशातील नेते आहेत. ते १० जागा लढतायेत. सगळ्यात मोठे नेते शरद पवार आहे. काँग्रेस देशात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रात त्यांची ताकद तिथेच त्यांनी लढले पाहिजे. शिवसेना-राष्ट्रवादीबाबत जे राजकारण घडलं, त्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे. त्याचा फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ, देशात काँग्रेसचा पंतप्रधान बसवायचा हे आमचं धोरण आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. 
 

Web Title: Loksabha election 2024: There are limits to discussion, how much to discuss?; Sanjay Raut target Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.