दीपक भातुसे
मुंबई : प्रचार गीतातील धार्मिक शब्दांबाबत घेतलेल्या आक्षेपावर फेरविचार करावा यासाठी उद्धवसेनेने दाखल केलेला अर्ज राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने फेटाळल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. आता याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल.
२४ एप्रिल २०२३ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार आयोगाने धार्मिक शब्द, मजूकर वापरल्याबद्दल व इतर कारणांसाठी विविध पक्षांना ३९ नोटीस जारी केल्या. यात उद्धवसेनेचाही समावेश आहे. यातील १५ नोटिसांना उत्तर आले आहे. उद्धवसेना या प्रचार गीतातील कोणताही शब्द वगळण्यास तयार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात दोनदा कोणताही शब्द वगळणार नाही यावर ठाम असल्याचे म्हटले. त्यामुळे आता उद्धवसेना फेरविचार याचिका करणार का? प्रचार गीत प्रसारित करणार काय याकडे लक्ष लागले आहे.
ठराविक शब्दाचा उल्लेख नाहीनोटीसमध्ये ‘जय भवानी’ शब्दाचा उल्लेख नाही. मात्र, प्रचार गीतात धार्मिक शब्दाचा उल्लेख असू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ठाकरेंनी निवडणूक आयोगाने प्रचार गीतातील ‘जय भवानी’ या शब्दाला आक्षेप घेतल्याचे सांगितले हाेते.