नागपूर - Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. मविआची एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढत अशी संकल्पना समोर आणल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आधी तुमचे भांडण मिटवा असं आम्ही मविआला सातत्याने सांगत होतो. परंतु त्यांचे भांडण मिटत नाही. त्यामुळे वंचितवर आरोप करण्यात आले अशी टीकाही आंबेडकरांनी मविआवर केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होणार होती हे आम्हाला अगोदरपासून माहित होते. म्हणून आधीपासून आम्ही महाविकास आघाडीचे भांडण आधी मिटवा. ते मिटलं की, आम्हाला मतदारसंघ मागायला सोपं होईल अशी भूमिका घेतली. परंतु, वंचित आम्हाला जागा देत नाही, कोणत्या पाहिजे ते सांगत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. त्यांचा समझोता होत नाही, त्याठिकाणी आम्ही जाऊन त्यामध्ये बिघाड होण्याची परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्वाच्या भूमिका घेतल्या. त्यात आम्ही खरगेंना पत्र लिहिलं, मविआत तुम्हाला ज्या जागा मिळतील त्यातील ७ जागांवर आम्ही पाठिंबा देऊ. त्यात कोल्हापूर, नागपूर आम्ही पाठिंबा दिला आहे. उरलेल्या जागांची माहिती त्यांच्याकडून येईल तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं सांगितले.
तसेच सध्या काही सामाजिक, राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यात एकाच विचारांची माणसे आणि संघटना एकमेकांविरोधात लढतायेत. १४-१६ मतदारसंघ असे आहेत. जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचं अस्तित्व आहे. उरलेल्या २ पक्षाचे अस्तित्व नाही. गेली २०-२५ वर्ष युतीच्या राजकारणात लढल्याने जिथे लढलेत तिथेच त्या पक्षांची ताकद आहे. जिथे लढलेत तेच मतदारसंघ मागत आहेत. ज्या मतदारसंघात लढले नाहीत तिथे त्यांची ताकद नाही. भाजपाचीही तीच परिस्थिती आहे, अनेक संघटनांना सोबत घ्यावे लागतंय. प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार पळवण्याचा भाग चालला आहे. काही पक्ष फोडीचा भाग चालला आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
दरम्यान, वंचितला सोबत घेण्याच्या महाविकास आघाडीला दोन अडचणी होत्या. एक भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि मोदी यांना अंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे. दुसरी विस्थापितांच्या सत्तेला प्रस्थापितांचा कायम विरोध राहिला आहे. आमचं मोदींसोबत भांडण नाही. अदृश्य शक्तींशी भांडण आहे असं मुंबईच्या सभेत म्हटलं गेले. निवडणुका असल्या तर समोरच्या व्यक्तीला अंगावर घ्यावे लागले. गेल्या १० वर्षात त्याने काय केले हे सांगणं गरजेचे होते. मी मुंबईच्या सभेत अनेक गोष्टी मांडल्या असत्या म्हणून मला केवळ ५ मिनिटे दिली गेली. तिथे वंचितची अडचण होती. मोदी आणि आरएसएसला थेट अंगावर घेण्याची ताकद वंचितकडे आहे. विस्थापितांना सत्तेत सहभागी करून घेण्यास प्रस्थापितांचा विरोध कायम राहिला आहे. याच प्रस्थापितांनी भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादी सगळेच पक्ष ताब्यात घेतले. या पक्षांचे निवडून येणारे आमदार एकमेकांशी निगडीत आहेत असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.
...त्यामुळे आम्ही राज्यात निवडणूक लढवतोय
विस्थापितांना सोबत घेऊन सत्तेत गेले पाहिजे हा आमचा आग्रह होता. परंतु आमची भूमिका मान्य झाली नाही. निवडणूक जवळ आली त्यामुळे आमच्या तयारीच्या जोरावर आम्ही निवडणुकीला उभं राहतोय. राज्यातील अनेक मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. इलेक्टोरल बॉन्ड हा प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असेल. हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हुकुमशाहाला देशात जन्म दिला जातोय, त्यावर सुप्रीम कोर्टाने नोटबंदीबाबत निरिक्षण नोंदवले, अर्थमंत्र्यांनाही याची जाणीव नव्हती. हा निर्णय बेकायदेशीर आहे असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत ओबीसीचं आरक्षण स्वतंत्र असले पाहिजे आणि ते वाचले पाहिजे ही आमची भूमिका आहे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.