मुंबई - Vasant More Meet Prakash Ambedkar ( Marathi News ) पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. राजगृह निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांच्यात पुणे लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी मनसेला रामराम केला. महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती. परंतु मविआनं या मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली.
धंगेकरांच्या उमेदवारीनंतर वसंत मोरे यांनी अन्य पर्यायाची चाचपणी केली. त्यात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळावा यासाठी मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. कुठल्याही परिस्थितीत मी पुणे लोकसभा लढवणारच असा चंग वसंत मोरे यांनी बांधला आहे. त्यासाठी ते पर्यायी पक्षाची चाचपणी करत आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे तिसरा पर्याय सध्या वसंत मोरे यांच्याकडून शोधण्याचा प्रयत्न होत आहे.
मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांनी शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसच्या मोहन जोशी, रवींद्र धंगेकर यासारख्या नेत्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी या नेत्यांना गळ घातली. परंतु मविआ नेत्यांनी मोरे यांना लोकसभेच्या उमेदवारीचं कुठलेही आश्वासन दिले नाही. मात्र ज्या कारणासाठी मनसेतून बाहेर पडलो त्यातून माघार नाही असं वसंत मोरे म्हणाले. नुकतेच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वंचितने ९ मतदारसंघात त्यांचे उमेदवारही दिले आहेत. त्यात पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितचा पाठिंबा मिळावा यासाठी वसंत मोरे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आंबेडकर यांच्या भेटीनंतर वंचित वसंत मोरेंना पाठिंबा देणार का हे पाहणे गरजेचे आहे.