दीपक भातुसेमुंबई : लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केली म्हणून कोल्हापूर मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे बाजीराव खाडे यांना काँग्रेसने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. मात्र, सांगलीत बंड करणाऱ्या विशाल पाटील यांच्याबाबत मौन बाळगले आहे. याबाबत कारवाई करण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला नसून तो अखिल भारतीय काँग्रेसला असल्याचे सांगितले जात आहे.खाडे यांनी युवक काँग्रेस ते राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले. प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय ओळखले जात होते.
कारवाईकडे दुर्लक्ष...सांगलीतून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता. उद्धवसेनेनेही कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडे केली होती. २२ एप्रिल रोजी सांगली मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा होता. मात्र, विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता बंडखोरी केली आहे. काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारीही सध्या विशाल पाटील यांचा प्रचार करीत आहेत.
काँग्रेसचे नेते आज सांगलीतसांगलीतील उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गुरुवारी सांगलीत सभा होत आहे.
कारवाईसाठी दिल्लीचे कारणकाँग्रेस पक्षाच्या राज्यघटनेनुसार लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारावर कारवाई करण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष किंवा राज्य प्रभारीला असतात. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसवर दोन प्रकारचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात. काही प्रतिनिधी हे प्रदेश काँग्रेसतर्फे नियुक्त केले जातात तर काही प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेसतर्फे नियुक्त केले जातात. विशाल पाटील हे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसमार्फत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार अखिल भारतीय काँग्रेसला आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने विशाल पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे प्रदेश काँग्रेसमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.