मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 02:15 PM2024-02-16T14:15:56+5:302024-02-16T14:16:23+5:30
Ajit Pawar News: अजित पवार बारामतीकरांना भावनिक साद घालू लागले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंविरोधात कार्यकर्त्यांना ते सावध करत आहेत.
मी मुख्यमंत्री पदासाठी हपापलेला नाहीय. मी पक्षही चोरलेला नाहीय असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीबारामतीतील कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे सुतोवाचही केले आहे.
देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशावेळी अजित पवारबारामतीकरांना भावनिक साद घालू लागले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंविरोधात कार्यकर्त्यांना ते सावध करत आहेत. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही, भावनिक होऊन कामे होत नाहीत, असे अजित पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
याचबरोबर संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनीही घराबाहेर पडावे. कार्यकर्त्यांनी आपल्या पाहुण्या रावळ्यांना भेटावे, त्यांना समजून सांगावे, असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. गावात दोन गट आहेत, ज्याचा निवडून येईल त्याला मदत करा. आम्ही कोणाचा पक्ष चोरला नाही हे सांगा. संसदेत भाषण करून प्रश्न सुटत नाहीत हे सांगा. २००४ ला मुख्यमंत्री पदाची संधी होती. परंतु संधी घेतली नाही. मी मुख्यमंत्री पदाला हपापलेलो नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.