"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:59 AM2024-05-09T11:59:10+5:302024-05-09T12:10:04+5:30

Devendra Fadnavis : अजित पवारांनी केलेल्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

Loksabha Election Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray on party merger with Congress | "अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला

"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे.निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांचाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं म्हटल्यावर अजित पवार यांनी मात्र ही गोष्ट नाकारली. उद्धव ठाकरे असा निर्णय घेणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे पक्ष विलीन करणार नाहीत - अजित पवार

पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पक्षविलीनकरणार भाष्य केलं आहे. "मला जे वाटलं ते मी केलं. आता त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं. कधी कधी एक संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठीही अशा प्रकारची विधाने येतात. त्यांचं विधान आल्यानंतर आता उद्धवजींचाही त्यांनी उल्लेख केला. मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसमध्ये विलीन करतील. उपमुख्यमंत्री म्हणून मी उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळून पाहिलं आहे. मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळायची. मी त्यांचा स्वभाव जो पारखलाय किंवा त्यांची कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील, पक्ष विलीन करण्याचा असं मला अजिबात वाटत नाही," असं अजित पवारांनी म्हटलं.

शरद पवार म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील - देवेंद्र फडणवीस

"उद्धव ठाकरे हे काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करणार नाही असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार हे उद्धव ठाकरेंसाठी सकारात्मक बोलले असल्याची चर्चा सुरु झालीय. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलंय. अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात माहिती नाही. पण मी उद्धव ठाकरेंना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धव ठाकरेंचे तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक शरद पवार आहेत. शरद पवार जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील," अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

"मी शरद पवारांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती हे अजित पवार यांनी म्हटलं ते स्पष्ट आहे. शरद पवार यांच्यासोबत अजित पवारांनी पक्ष उभा केला. आपल्याला पक्षामध्ये स्थान मिळणार नाही, हे कळल्यावर अजित पवारांना पक्षातून बाहेर निघावं लागलं," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 

Web Title: Loksabha Election Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray on party merger with Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.