मुंबई - Vinod Tawade on BJP ( Marathi News ) निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. भाजपा स्वबळावर या निवडणुकीत ३४० ते ३५५ जागा मिळतील अशी भविष्यवाणी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे. मात्र त्यांचं हे विधान पंतप्रधान मोदींच्या त्या विधानाच्या विपरीत आहे. मोदींनी भाजपा ३७० जागा जिंकेल असा दावा केला होता. तावडे यांच्या अंदाजानुसार भाजपा निर्धारित टार्गेटपेक्षा १५ ते ३० जागा कमी जिंकेल असं दिसून येत आहे.
विनोद तावडे म्हणाले की, एनडीएचे सहकारी पक्ष जवळपास ७० जागा जिंकतील तर भाजपा ३४० ते ३५५ जागा विजयी होईल. यंदाच्या निवडणुकीत भाजपानं १६० अशा जागांवर लक्ष केंद्रीत केले जिथं याआधी भाजपा कधी जिंकला नाही आणि जिंकणेही कठीण होतं. त्यामुळे यंदा भाजपा ६०-६५ नव्या जागांवर विजयी होईल. भाजपाला यंदा तेलंगणा, ओडिशा, उत्तर प्रदेशात २०१९ च्या तुलनेनं जास्त जागा मिळतील. तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश याठिकाणी २०१९ च्या निकालाची पुनरावृत्ती होईल. बिहारमध्ये कदाचित १ जागा कमी मिळू शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.
तसेच पंतप्रधान मोदी हिंदू मुस्लीम मतांचे धुव्रीकरण करतायेत असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्याचं खंडनही तावडेंनी केले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजमल कसाब याला शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या हत्येतून क्लीन चीट दिली. भाजपानं त्यावर भाष्य केले. काँग्रेसची दहशतवादाबाबत जी दुहेरी भूमिका आहे त्याचा खरा चेहरा भाजपाने उघडा पाडला असा पलटवार विनोद तावडे यांनी केला.
२०२१ पासून विनोद तावडे केंद्राच्या राजकारणात
विनोद तावडे हे लोकसभेचे उमेदवार नसले तरी ते दिल्लीतून पक्षाच्या प्रचार रणनीतीत सक्रीय आहेत. निवडणुकीच्या काळात इतर पक्षातील नेत्यांना सोबत घेणे, पक्षात त्यांचा पक्षप्रवेश करणे याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. दिल्लीत भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नेत्याच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते दिसतात. विनोद तावडे हे बिहारचे भाजपा प्रभारी होते. नितीश कुमार यांना पुन्हा एनडीएमध्ये आणण्यासाठी तावडेंची भूमिका महत्त्वाची ठरली. २०२० मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातून तावडे केंद्राच्या राजकारणात आले. त्यांना भाजपाचं राष्ट्रीय सचिव बनवलं. २०२१ मध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी दिली. ते लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वॉर रुमचा भागही आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला विशेष महत्त्व आहे.